नागपूर : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २ दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेवरून महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात महाविकासआघाडीने आंदोलन केलं, तर आदित्य ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळला तिकडे गेले. यावेळी ठाकरे समर्थक आणि राणे समर्थक यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला.
शरद पवारांनी केले मोठे वक्तव्य?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवारांनी एक मोठे विधान केले. भ्रष्टाचार कुठे करायचा, याचंही तारतम्य नसल्याची टीका शरद पवारांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यांच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भ्रष्टाचार कुठेच नको, त्याला शरद पवार काय, सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. असं वक्तव्य करून इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराला ते समर्थन देतात का? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय वक्तव्य केलं जात आहे. पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडणुका पाहून असं वक्तव्य करणं शोभत नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळ नेव्हीने तयार केला, राज्य सरकारने तयार केला नाही, हे त्यांना माहिती आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.