अहमदनगर : आधीच्या सरकारच्या काळात ज्या घटनेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला होता, त्या घटनेतील पीडित निर्भयाच्या कुटुंबीयांची खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी कोपर्डी येथे जाऊन भेट घेतली.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या आई वडिलांची भेट घेतली. निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची चर्चा केली. यावेळी त्यांनी निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती घेतली.
दरम्यान कोपर्डी घटनेचा खटला जलद गतीने चालून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, कोपर्डीच्या भगिनीला अभिवादन करण्यासाठी मी आलोय. माझी सरकारला विनंती आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात एक अर्ज करावा आणि या खटल्यासाठी एक स्पेशल बेंच स्थापन करण्याची विनंती करावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण निकाली काढावं. यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
2016 साली ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर 2017 साली या प्रकरणाचा निकालही लागला. मात्र प्रकरण आता उच्च न्यायालयात आहे.