शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण
मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावा, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असा निरोप शिवसेनेच्या वतीने संभाजीराजेंना देण्यात आला होता. यासंदर्भात शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. पण संभाजीराजेंनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण संभाजीराजे शिवसेनेची ही ऑफर स्वीकारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपण अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. तसेच सर्व अपक्ष आमदारांनाही आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले होते. यानंतर त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.
तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा शिवसेनेला असेल, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे राज्यसभेसाठी शिवसेना त्यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरुस्कृत उमेदवार असतील अशी माहिती समोर आली आहे.