निवडणुकांच्या तोंडावर ‘छप्पर फाड के’; आमदारांना 84 लाखांचा निधी

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने विधानसभा आमदारांना प्रत्येकी 84 लाख रुपयांचा अतिरिक्‍त निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सात महिन्यांच्या कालावधीसाठी आमदारांना पूर्णपणे वर्षभरासाठीचा 2 कोटी रुपयांचा आमदार निधी मिळणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आमदारांना खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

साधारणपणे सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने आमदारांना तातडीने प्रशासनाला नवीन कामे सुचवावी लागणार आहेत. तर, जिल्हा प्रशासनाला या कामांना वेळेत सर्व मंजुरी घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी अवघा दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार असून

12 महिन्यांत खर्च करावयाचा निधी दोन महिन्यांत विकास कामांना मान्यता घेऊन कामे मार्गी लावण्याचे आव्हान असणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आमदारांना वर्षभरात दोन कोटींचा नधी देण्यात येतो. साधारणपणे महिनाभरासाठी आमदारांना 16 लाख 66 हजार या प्रमाणे निधी मंजूर करण्यात येतो. 2019-20 या अर्थिक वर्षात राज्य शासनाने एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 1 कोटी 16 लाख रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर केला होता. दरम्यान, पुणे जिल्ह्यात 21 आमदार असून या आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विकास कामांना निधी मिळणार असून विकासाला चालना मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.