#Video : सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही – छगन भुजबळ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप करण्यात आले होते.  आज मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यावर “सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, या प्रकरणात जवळपास सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. अनेक खोटेनाटे आरोप आमच्यावर झाले तसेच मीडीया ट्रायलदेखील झाली. हा संपूर्ण संघर्षमय प्रवास भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितला. या कठीण काळात ज्या मंडळींनी सहकार्य केले त्या सर्वांचे भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.

मी तसेच समीर भुजबळ निर्दोष होतो, एका पैशाचाही घोटाळा झालेला नाही याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र तरीही आरोपांची राळ उठवण्यात आली. हे सर्व द्वेषबुद्धीने करण्यात आले का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये जनता की दुवाएँ है, उन्हे मुक्कमल नहीं होने देती…” या शायरीद्वारे भुजबळ यांनी आपला आनंद व्यक्त केला. जनतेच्या आशीर्वादामुळे या प्रकरणातून आम्हाला निर्दोष म्हणून वगळण्यात आले. आम्ही निर्दोष आहोत हे  शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांना माहीत होतेच. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही हा विश्वास होता, त्यामुळेच त्यांनी मला मंत्रिमंडळात जागा दिली”, असे सांगत भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.