संगमनेर – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घ्यायला तयार नसेल तर त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे. त्यांच्यासारखा ओबीसींचा नेता आमच्याकडे आला तर पक्षाचा चेहरा मोहरा बदलून जाईल, अशी ऑफर रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर ना. आठवले थांबले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, छगन भुजबळ माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी ओबीसी समाजासाठीचा लढा तीव्रतेने लढला. ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र, नाशिकमधून त्यांच्या शिवसेनेत येण्याला विरोध आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडायची असेल तर शिवसेनेपेक्षा आमच्या रिपाइंत यावे.
आम्ही सर्वांना घेऊन सर्वसमावेशक काम करीत आहोत. भुजबळ आमच्याकडे आले तर पक्षाला मोठा फायदा होईल. त्यामुळे त्यांना माझी सूचना आहे की, त्यांनी आमच्याकडे यावे. महायुतीत 18 जागा मित्र पक्षांना द्यायचे ठरलेले आहे.बाकी चर्चा सुरू आहे. रिपाइंला कोणत्या द्याच्या त्या भाजप ठरवत आहेत. 135 भाजप आणि 135 शिवसेना असे सूत्र सध्या ठरत आहे. त्यात मित्रपक्षाच्या वाट्याच्या दहा जागा आम्ही रिपाइंसाठी मागत आहोत.
भाजप-सेना युती व्हावी, असे आपल्याला वाटते. त्यासाठी आग्रह देखील करीत आहोत. युती झाली नाही, तरी भाजपला 175 जागा मिळतील. एकत्रित लढून 230 ते 240 जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी भाजप शिवसेनेने एकत्र राहिले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.