नाशिक – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही शिवसेना जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. मात्र, या वृत्ताचे खंडन करत या अफवा असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. भुजबळ हे 27 जुलै रोजी पुन्हा शिवसेने प्रवेश करून शिवधनुष्य पेलणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
यावर स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, या बातम्या खोट्या आहेत. अशा प्रकाराच्या बातम्यांमध्ये कोणेतही तथ्य नाही. तरी माझी प्रसार माध्यम आणि इतरांना विनंती आहे की, अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवू नये आणि अशा बातम्यांवर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. सचिन अहिर आणि माझा मुळचा मतदारसंघ भाखयळा जवळ असल्याने या चर्चा सुरु झाल्या असाव्या, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात छगन भुजबळ हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते होते. त्यांनी 1991 रोजी शिवसेनेला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 1999मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.