Ajit Pawar | Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. आता तशीच फूट पवार कुटुंबातही झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काल बारामतीकरांना प्रथमच पवारांच्या कुटुंबातील दोन पाडवे पाहावे लागले. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाडवे वेगळे साजरे झाले. पाडव्याला अजित पवारांची बाकीच्या कुटुंबियांसोबत भेट झालीच नाही.
आता आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमीच दिसत आहे. पण सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज संध्याकाळपर्यंत एकत्रित येऊन भाऊबीज साजरी करतील अशी भावना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “आपण सर्वांनी अपेक्षा करूयात की सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज संध्याकाळपर्यंत एकत्रित येतील भाऊबीज साजरी करतील. यावेळी एकत्रित भाऊबीज साजरी नाही केली तर निदान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला त्यांनी एकत्रित आलं पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
‘बारामतीत यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पण आपण सर्वांनी एक अपेक्षा करूयात की, आज रात्रीपर्यंत त्यांनी एकत्र यावे. भाऊबीज साजरी करावी. समजा आता एकत्र नाही आले तर किमान पुढच्या वर्षी तरी भाऊबीजेला एकत्र आलं पाहिजे.
आता राजकीय विचार त्यांचे वेगळे असू शकतात. जसं शरद पवारांनी सांगितलं की, मी कुटुंब फूटू देणार नाही. त्यामुळे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.