पिंपरी, दि. 24 – सिंधी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत झुलेलाल यांचा जन्मोत्सव आणि चेटीचंड उत्सव पिंपरी कॅम्प परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी “जय झुलेलाल’ असा जयघोष करण्यात आला. तसेच पिंपरी कॅम्प येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समाजातील विविध चित्ररथ सहभागी झाले होते. या वेळी मुलांनी नृत्य सादर केले. पालखी मिरवणूक काढण्यात आली.
चेटीचंड उत्सवानिमित्त सिंधी समाजबांधवांनी कुलदैवताच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पूजा करण्यात आली. तसेच मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. महिलांना टिपरी नृत्य सादर केले. मिरवणुकीत चित्ररथ, पालखी, ढोल पथक, बॅंड पथक, पंजाबी पथकाचा समावेश होता. संत झुलेलाल यांचा चित्ररथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. विविध पथकांना आपली कला सादर केली. ही मिरवणूक लाल मंदिर, शगुन चौक, साई चौक शनी मंदिर, जमतानी चौक, नदी घाटातून सुरू होऊन झुलेलाल मंदिराजवळ समारोप झाला.
जगभरातील सिंधी समुदाय हा सण गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. संत झुलेलाल यांनी सिंधी समाजाला धार्मिक संकटातून वाचवले म्हणून सिंधी समाज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. पिंपरी कॅम्प परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समाजातील मनोहर जेठवानी, महेश मोटवानी, राजू आसवानी, हिरालाल रिजवानी, कैलास बजाज, सुशील बजाज, किरण रामनानी, जवाहर कोटवानी, शारो तिलोकानी, अशोक लुल्ला आदींनी सहभाग घेतला.