मुंबई – भारताच्या कसोटी संघातील तंत्रशउद्ध फलंदाज मानला जात असलेल्या चेतेश्वर पुजारा याने येथे सुरु असलेल्या रॉयल लंडन एकदिवसीय करंडक काउंटी क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 73 चेंडूत शतकी खेळी करत सर्वांनाच धक्का दिला मात्र, या शतकी खेळीनंतरही त्याच्या ससेक्स संघाला हा सामना अवघ्या 4 धावांनी गमवावा लागला.
पुजाराने ससेक्सकडून खेळताना वॉर्विकशायर विरुद्धच्या सामन्यात 73 चेंडूत शतक फटकावले. त्याने या खेळीत एका षटकात तब्बल 3 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 22 धावा काढल्या.
वॉर्विकशायरने रॉब येट्सच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 6 गडी गमावून 310 धावा केल्या. रॉबने 111 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 114 धावांची खेळी केली. कर्णधार विल रोड्सने 76 व मायकेल बर्गेसने 58 धावांची खेळी केली.
311 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ससेक्सचा डाव 50 षटकांत 7 बाद 306 धावांवर रोखला गेला. या डावादरम्यान पुजाराने नॉर्वेलने टाकलेल्या षटकांत 4,2,4,2,6 व 4 अशी फटकेबाजी करत 22 धावा वसूल केल्या. पुजाराने 73 चेंडूत शतक फटकावले. अखेरच्या दोन षटकांत 20 धावांची गरज असताना पुजारा बाद झाला. पुजाराने 79 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली.