चेतन सकारियाच्या वडिलांचे करोनाने निधन

भावनगर (गुजरात) – सौराष्ट्र आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाचे वडील कानजीभाई सकारिया यांचे करोनामुळे  रविवारी (दि. 9 मे) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भावनगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. याबाबतची माहिती राजस्थान रॉयल्सने ट्विट करत दिली आहे.

आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सकारिया देखील वडिलांची सेवा करण्यासाठी भावनगरमध्ये गेला होता. सकारिया याने दोन दिवसांपूर्वीच वडिलांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली होती. राजस्थान रॉयल्सकडून मला काही दिवसांपूर्वीच पैसे मिळाले आहेत, हे माझं भाग्य आहे. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये याचा उपयोग होईल.

“मी माझ्या वडिलांच्या चांगल्या उपचारासाठी क्रिकेट आणि आयपीएलमधून मिळालेले पैसे देत आहे. ही स्पर्धा 1 महिना झाली नसती तर माझ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली असती. मी गरीब कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेंपो चालवला आहे. आयपीएलमुळेच आमचं आयुष्य बदलले आहे, असेही त्याने म्हटले होते.

दरम्यान, चेतन सकारियाने सौराष्ट्राकडून 15 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने 41 विकेट्‌स घेतल्या आहेत. तसेच यंदाच्या आयपीएल मोसमात 7 सामन्यांमध्ये 7 विकेट्‌स घेतल्या आहेत. त्याने पहिल्याच सामन्यात 3 विकेट्‌स घेत जोरदार पदार्पण केले होते.

त्याने या स्पर्धेत केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना या सारख्या दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला आहे. पहिल्याच आयपीएलमध्ये त्याने केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. दुर्दैवाने आयपीएल स्पर्धा स्थगित होताच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.