पुणे – अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंचांच्या उपस्थितीत भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांचे येथील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लोहगाव विमानतळावर मंगळवारी सकाळी कुंटे यांचे आगमन झाले. यावेळी ज्येष्ठ बुद्धिबळ संघटक प्रकाश कुंटे, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे सहसचिव शेखर जोरी, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, नितीन शेणवी, अथर्व गोडबोले, विनिता श्रोत्री, फिडे पंच अमरीश टिल्लू , मितला शेणवी, अमित केंच, संकेत यादव, गणेश अंताड, विभा लिमये, अमोल पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने बुडापेस्ट, हंगेरी येथे नुकत्याच झालेल्या 45व्या फिडे चेस ऑलिंपियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे. कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने गतवेळी चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
“भारतीय पुरुष व महिला संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारताचे वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशामध्ये दोन्ही संघांमधील खेळाडू आणि त्यांना मदत करणारे अनेक जण तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचा मोठा वाटा आहे. यापुढेही भारतीय खेळाडू अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करत राहतील अशी मला खात्री आहे.” अशी प्रतिक्रिया अभिजित कुंटे यांनी यावेळी दिली.