अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा : ग्रॅंडमास्टर्स खेळांडूंची विजयी वाटचाल

पुणे – अनुभवी खेळाडू एम.आर.व्यंकटेश, लक्ष्मण, सप्तर्षी रॉय चौधरी या ग्रॅंडमास्टर्स खेळाडूंनी भारतबाई हलकुडे स्मृती अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीअखेर विजयी वाटचाल कायम राखली.

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत व्यंकटेश याने प्रदीप सुतार याच्यावर शानदार विजय मिळविला. काळ्या मोहरांनी खेळतानाही त्याने सुरेख डावपेच करीत ही लढत जिंकली. त्याचा सहकारी लक्ष्मण यालाही केतन पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूवर मात करताना फारशी अडचण आली नाही. तामिळनाडूच्या पी.शामनिखिल याने शिवराज पिंगळे याचा पराभव केला. त्याने सुरुवातीपासून कल्पक चाली करीत डावावर नियंत्रण मिळविले होते व शेवटपर्यंत आपला वरचष्मा राखला. सप्तर्षी याने प्रदीप आवाडे याला पराभूत केले. व्यंकटेश, लक्ष्मण, सप्तर्षी व शामनिखिल यांचे तिसऱ्या फेरीअखेर प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ खेळाडू अरुण वैद्या यांनी देवांशु मिस्त्री याच्यावर विजय मिळविताना आपल्याकडे अजूनही या खेळावर हुकमत गाजविण्याचे कौशल्य आहे हे दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, विक्रमादित्य कुलकर्णी, शशिकांत कुतवळ या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले अपराजित्व राखले. अनुप व विक्रमादित्य यांनी अनुक्रमे सिद्धांत गवई व यश मरसट्टीवार यांचा पराभव केला. उदयोन्मुख खेळाडू संकर्ष शेळके यानेही तिसऱ्या फेरीअखेर तीन गुणांची कमाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.