हलकुडे चषक बुद्धिबळ स्पर्धा : पाचव्या फेरीअखेर चार खेळाडू आघाडीवर

पुणे – ग्रॅंडमास्टर एम.आर.व्यंकटेश (तामिळनाडू), सप्तर्षी रॉय चौधरी (पश्‍चिम बंगाल) यांच्याबरोबरच महाराष्ट्राच्या विक्रमादित्य कुलकर्णी व सुयोग वाघ यांनी भारतबाई हलकुडे स्मृती चषक अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर संयुक्त आघाडी घेतली. त्यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत.

सिद्धी बॅंक्वेट्‌स येथे जयंत गोखले बुद्धिबळ अकादमी व आर्यन एंटरप्राईज यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. चौदा खेळाडूंनी प्रत्येकी साडेचार गुणांसह आव्हान राखले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या संकर्ष शेळके, शशिकांत कुतवळ, वेदांत पिंपळखरे, ओम कदम, गौरव झगडे, साक्षी चितलांगे यांचा समावेश आहे.

तामिळनाडूच्या व्यंकटेश याने पाचव्या फेरीतील चुरशीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख याच्यावर मात केली. विक्रमादित्य याने सिद्धांत गायकवाड याला पराभूत केले. हा डाव रंगतदार झाला. त्यामध्ये विक्रमादित्य याने कल्पक खेळ करीत विजयश्री खेचून आणली. सप्तर्षी याने आर.शिवसुब्रमण्यम याच्यावर शानदार विजय मिळविला. वाघ याने अपराजित्व राखताना अनिरुद्ध चटर्जी याचा पराभव केला.

उदयोन्मुख खेळाडू संकर्ष याने आंतरराष्ट्रीय मास्टर एल. मुथाई याला बरोबरीत रोखले व आश्‍चर्याचा धक्का दिला. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे हिने आंतरराष्ट्रीय मास्टर संतायन दास याला बरोबरीत ठेवले. ए.आर.हरीकृष्णन या आंतरराष्ट्रीय खेळाडूला फिडेमास्टर एम.विनयकुमार याच्याविरुद्धचा डाव अनिर्णित ठेवावा लागला. या दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी साडेचार गुण झाले आहेत. कुतवळ याने आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू गुसेन हिमाल याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. पिंपळखरे याने सौरभ म्हमाणे याला पराभूत केले.

अनपेक्षित विजय नोंदविण्याची क्षमता असलेल्या गौरव झगडे याने आर्चित खरे याच्यावर आकर्षक विजय मिळविला. ओम कदम यानेही ओम बरडे याला पराभूत करताना सुरेख डावपेचांचा प्रत्यय घडविला. आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा, रवी हेगडे व शेखर साहू या अनुभवी खेळाडूंनीही पाचव्या फेरीत उल्लेखनीय विजय मिळविला. त्यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.