धनादेश वटविण्याचे काम होणार लवकर

सप्टेंबरपासून सर्व बॅंक शाखांत सीटीएस व्यवस्था

मुंबई – सप्टेबरपासून देशातील सर्व बॅंक शाखांमध्ये आकृती आधारित चेक टृंकेशन व्यवस्था (सीटीएस) लागू करण्याची सूचना रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना केली आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपासून देशातील कोणत्याही बॅंक शाखेत दाखल केलेला धनादेश लवकर वटू शकणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना आता रिझर्व्ह बॅंकेने जारी केली आहे. ही यंत्रणा लागू करण्यासाठी सर्व बॅंकांना 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

त्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा निवडण्याचा अधिकार रिझर्व्ह बॅंकेने व्यवसायिक बॅंकांना दिला आहे. देशातील बॅंकांच्या दीड लाख शाखांमध्ये 2010 पासून धनादेश वठविण्यासाठी सीटीएस यंत्रणा वापरात आहे.

मात्र या सुविधेचा फायदा देशातील 18,000 बॅंक शाखांमध्ये उपलब्ध नव्हता. त्यामुळे या शाखातील ग्राहकांची कुचंबणा होत होती. यातून मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सर्व शाखांमध्ये अशी यंत्रणा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या या निर्णयाचे बॅंक ग्राहकांनी स्वागत केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.