चेन्नई – दीपक चहरच्या अफलातून गोलंदाजीनंतरही चेन्नई सुपर किंग्जला रविवारी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. 3 बाद 33 अशा बिकट स्थितीतून कर्णधार नितीश राणा व रिंकू सिंग यांनी जबाबदारीने अर्धशतकी खेळी करत कोलकाताचा विजय साकार केला.
विजयासाठी 145 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरात असलेला सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाज व व्यंकटेश अय्यर पाठोपाठ बाद झाल्याने त्यांची स्थिती 2 बाद 21 अशी बिकट बनली. जेसन रॉयने थोडी चमक दाखवली मात्र, त्यालाही पहिल्या दोघांप्रमाणेच दीपक चहरनेच बाद केले. त्यानंतर मात्र, रिंकू सिंगने कर्णधार नितीश राणासह डाव सावरताना संघाचे शतक धावफलकावर लावले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. रिंकूने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. पाठोपाठ राणानेही हा पल्ला पार केला. रिंकू अर्धशतक पूर्ण झाल्यावर अनावश्यकपणे एकेरी धाव घेताना धावबाद झाला. त्याने आपल्या 54 धावांच्या खेळीत 43 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावले. त्यानंतर राणाने आंद्रे रसेलच्या साथीत संघाचा विजय साकार केला. राणाने नाबाद 57 धावांची खेळी करताना 44 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. रसेल 2 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना शिवम दुबे व रवींद्र जडेजा यांनी उपयुक्त खेळी केली. त्यांच्या या कामगिरीमुळेच चेन्नई सुपर किंग्जला रविवारी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 20 षटकांत 6 बाद 144 धावा अशी मजल मारता आली. जडेजा बाद झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे स्ट्राईक आल्यामुळे दुबे अर्धशतकापासून वंचित राहिला.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेव्हन कॉनवे यांनी 31 धावांची सलामी दिली. ऋतुराज चांगला खेळत असताना 17 धावांवर परतला. त्यानंतर कॉनवेने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. रहाणे धोकादायक ठरेल असे वाटत असतानाच 11 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावत 16 धावांवर परतला. पाठोपाठ स्थिरावलेला कॉनवेही 30 धावांवर बाद झाला. त्याने 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार फटकावले.
यावेळी खेळपट्टीवर आलेला अंबाती रायडू व त्यानंतर आलेला मोईन अलीही बाद झाल्याने चेन्नईचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, त्यानंतर शिवम दुबेने रवींद्र जडेजाला साथीला घेत डाव सावरताना संघाला शतकी मजल मारून दिली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या महत्त्वाच्या षटकांत जडेजा 20 धावांवर बाद झाला. यावेळी फलंदाजीला आलेला धोनी 3 चेंडूत केवळ 2 धावा करू शकला. मात्र, त्यामुळे दुबेला स्ट्राईक मिळाली नाही व ते 48 धावांवर नाबाद राहिला. त्याचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. या खेळीत त्याने 34 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार फटकावले.
लक्षवेधी
चेन्नई संघाचा घरच्या मैदानावर आणखी एक पराभव
चेन्नईच्या पराभवामुळे
स्पर्धेत पुन्हा रंगत
कोलकाताने विजयासह आव्हान कायम राखले
चेन्नईला दिल्ली विरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे
कोलकातासाठी लखनौ विरुद्धचा सामना
करो या मरो
धोनीच्या दुखापतीने निवृत्तीचे संकेत
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गुडघ्याला झालेल्या दुखापतीने चांगलेच सतावले आहे. सरावादरम्यानही तो एकेरी व दुहेरी धावा धावण्याचा सराव करताना लंगडताना दिसल्यामुळे हा धोनीचा अखेरचा आयपीएल मोसम असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यंदाच्या मोसमात धोनी फलंदाजीलाही सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येत आहे. त्याला जास्त षटके फलंदाजी करणे या दुखापतीमुळेच शक्य होत नसल्याचे बोलले जात आहे.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 144 धावा. (डेव्हन कॉनवे 30, रवींद्र जडेजा 20, शिवम दुबे नाबाद 48, सुनील नरेन 2-15, वरुण चक्रवर्ती 2-36). कोतकाता नाईट रायडर्स – 18.3 षटकांत 4 बाद 147 धावा. (रिंकू सिंग 54, नितीश राणा नाबाद 57, दीपक चहर 3-27).