दुबई -आयपीएल स्पर्धेतील आजची लढत रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. हा सामना विराट कोहलीच्या बेंगळुरूसाठी सराव ठरणार आहे तर, महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईसाठी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी रंगणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत या दोन्ही संघांना सुरुवातीच्या काही सामन्यांत अपयशाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चेन्नईने जरी मुंबई इंडियन्सचा पराभव केला असला तरीही चेन्नईने नंतरच्या सामन्यात अत्यंत सुमार कामगिरी केली.
त्याउलट कोहलीच्या संघाने सुरुवातीच्या सामन्यांतील अपयश भरून काढत स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये स्थानही निश्चित केले. त्यांची फलंदाजी सशक्त बनल्याचे कारण कोहली व एबी डीविलियर्स भरात आले हेच आहे. त्यांची गोलंदाजी देखील आता जास्त सरस होत आहे.
लेग स्पीनर यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, महंमद सिराज यांचे यश त्यांची चिंता मिटवणारे ठरले आहे. सिराज हा नवा उभरता गोलंदाजही प्रतिस्पर्धी संघांची डोकेदुखी ठरत आहे. अंबाती रायडू, धोनी, जडेजा व सॅम कुरेन यशस्वी ठरत असले तरीही त्यांची संथ फलंदाजी टीकेचा विषय बनली आहे. ज्या खेळाडूंच्या जोरावर चेन्नईने या स्पर्धेच्या इतिहासात आपला दबदबा प्रस्थापित केला तेच धावांसाठी झगडताना दिसत आहेत.
सामन्याची वेळ (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
दुपारी : 3ः30
ठिकाण ः दुबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर