चेन्नईचा कोलकातावर सुपर विजय; इम्रान ताहिरचे चार बळी

कोलकाता  – इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकुर यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन चेंडू आणि पाच गडी राखून पराभव करत आपली विजयी आगेकूच कायम राखली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनी निर्धारित 20 षटकांत 8 बाद 161 धावांची मजल मारुन चेन्नईसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईने हे आव्हान 19.4 षटकांत 5 गडी गमावत 162 धावा करुन पुर्ण केले.

यावेळी पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नईची सुरूवात वेगवान झाली. मात्र, त्यांचा सलामीवीर शेन वॉटसन केवळ 6 धावा करुन परतला. तर, फाफ ड्यु प्लेसिस देखील केवळ वेगाने खेळण्याच्या नादात 16 चेंडूत 24 धावा करुन परतला. त्यामुळे चेन्नईची 5.3 षटकांत 2 बाद 44 अशी अवस्था झाली. यानंतर आलेल्या अंबाती रायडूला साथीत घेत सुरेश रैनाने चेन्नईचा डाव सावरायला सुरूवात केली.

मात्र केवळ 5 धावा करुन रायडू परतल्याने चेन्नईला 61 धावांवर तिसरा धक्‍का बसला. त्यानंतर आलेल्या केदार जाधवने आल्या आल्या फटकेबाजी करत चेन्नईची खालावलेली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसऱ्या बाजुने सावध फलंदाजी करणाऱ्या सुरेश रैनाने देखील फटकेबाजी करायला सुरूवात केली. मात्र, 12 चेंडूत 20 धावांची खेळी करुन जाधव देखील परतल्याने चेन्नईला 81 धावांवर चौथा धक्‍का बसला.

जाधव बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीला साथीत घेत सुरेश रैनाने चेन्नईची खालावलेली धावगती वाढवताना चेन्नईला शतकीय मजल मारुन दिली. ही जमलेली जोडी चेन्नईला विजय मिळवून देइल असे वाटत असतानाच 13 चेंडूत 16 धावा करुन धोनी परतल्याने चेन्नईला मोठा धक्‍का बसला. धोनी बाद झाला तेंव्हा चेन्नईला विजयासाठी 26 चेंडूत 41 धावांची गरज होती. यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने सुरेश रैनाच्या साथीत

कोलकाताच्या गोलंदाजांना चौफेर फटके मारत चेन्नईचा विजय सुकर केला. यावेळी रैनाने देखील फटकेबाजीकरत यंदाच्या मोसमातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. रैनाने 42 चेंडूत नाबाद 58 तर जडेजाने 17 चेंडूत नाबाद 31 धावांची भागिदारी करत चेन्नईला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरूवात खराब झाली. स्फोटक फलंदाज सुनिल नारायण स्वस्तात परतल्यानंतर ख्रिस लिनने आक्रमक फलंदाजी करत कोलकाताला 10 षटकांत 80 धावांपर्यंत मजल मारून दिली.
यावेळी ख्रिस लिन आणि नितीश राणाची जोडी जमली असे वाटत असताना तहीरने नितीश राणाला 21 धावांवर बाद केले. तर, त्या पाठोपाठ ताहीरने उथप्पालाही बाद करत कोलकाताला तिसरा धक्का दिला. एका बाजुने विकेट्‌स पडत असताना दुसऱ्या बाजूने लिनने आपली आक्रमक फलंदाजी कायम राखत कोलकाताला शंभरी गाठून दिली. त्याने जेडेजाच्या एकाच षटकात सलग तीन षटकार खेचत षटकारांची हॅटट्रिक केली.

लिन आपले शतक झळकावणार असे वाटत असताना ताहिरने लिनला बाद करत कोलकाताला मोठा धक्‍का दिला. यावेळी लिनने 51 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या रसेलने पहिल्या दोन चेंडूवर चौकार अणि षटकार खेचत दहा धावा जमवल्या. मात्र, आणखीन एक षटकार मारण्याच्या नादात तोही बाद झाला.

लीन आणि रसेल दोघेही एकाच षटकात परतल्याने कोलकाताच्या धावगतीला ब्रेक लागला. त्यानंतर कर्णधार कार्तिकलाही फार काही करता आले नाही. तो केवळ 18 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना एकहीमोठा शॉट मारता न आल्याने कोलकाताला 161 धावांचीच मजल मारता आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.