कोलकाता – सुरेश रैनाच्या नाबाद 58 आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद 31 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईच्या संघाने 14 अकांसह गुणतालिकेत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर कोलकाताचा संघ 8 अकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
विजयासाठीचे 162 धावांचे आव्हान चेन्नईने 2 चेंडू आणि 5 गडी राखून पूर्ण केले. चेन्नईकडून सुरेश रैना याने सर्वाधिक नाबाद 58 धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने 17 चेंडूत 31 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला. कोलकाताकडून गोलंदाजीत पियुष चावला आणि सुनील नारेनने 2 गडी बाद केले तर हेरी गर्नीने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या होत्या. कोलकाता नाइट रायडर्सकडून फलंदाजीत क्रिस लिनने 51 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 82 धावा काढल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजीत इमरान ताहिरने 4 षटकांत 27 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मिचेल सैंटनरने 1 गडी बाद केला.