#IPL2019 : चेन्नईसमोर आज पंजाबचे कडवे आव्हान

चेन्नई सुपर किंग्ज Vs किंग्ज इलेव्हन पंजाब

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – एम. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई

चेन्नई  – आयपीएलच्या बाराव्या हंगामात प्रतिस्पर्धी संघावर संपूर्ण वर्चस्व गाजवताना क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांदरम्यान आजचा सामना होणार असून या दोन्ही संघांनी आपापल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एका सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच या सामन्याकडे धोनीचे चाणाक्ष नेतृत्व विरुद्ध अश्‍विनची विचित्र रणनीती आखण्याची पद्धत यांच्यातील सामना असे संबोधले जाते आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून गोलंदाज आणि फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विजयी मार्गावर सुसाट असणाऱ्या चेन्नई एक्‍स्प्रेसला मुंबई इंडियन्सने गत सामन्यात ब्रेक लावला असून गत सामन्यात केदार जाधवचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती तर सातत्याने चेन्नईच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा ड्‌वेन ब्राव्हो गत सामन्यात महागडा ठरल्याने त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

जरी चेन्नईने गत सामना गमावला असला तरी स्पर्धेतील हा त्यांचा पहिलाच पराभव असल्या कारणाने त्यांच्या संघाला विशेष फरक पडला नाही. त्यातच पहिल्या सामन्यापासून चेन्नईच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघावर दडपण वाढवत त्यांना 150 धावांच्या आत रोखण्यात यश मिळविले होते. मात्र, मुंबई संघाने अखेरच्या षटकांत ठोकलेल्या 29 धावांच्या बळावर मुंबईने चेन्नईसमोर 170 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघाला आपल्या गोलंदाजांचा वापर योग्य प्रकारे करण्याची गरज आहे.

तर, दुसरीकडे पहिल्या सामन्यापासून अश्‍विनच्या कामगिरीने सातत्याने चर्चेत असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथमच स्पर्धेत पहिल्या तीन संघांमध्ये मोसमाच्या सुरुवातीपासून स्थान टिकवून ठेवले आहे. यावेळी अश्‍विनने पहिल्याच सामन्यात राजस्थानच्या जोस बटलरला मंकड्‌स पद्धतीचा वापर करून बाद करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राजस्थानने आपल्या हातातील सामना गमावला होता. तर, दुसऱ्या सामन्यात अश्‍विनने क्षेत्ररक्षणाच्या मर्यादांच्या नियमाचे पालन न केल्याने बाद झालेल्या कोलकाताच्या आंद्रे रसेलला नाबाद ठरविण्यात आले.

मुंबई विरुद्धच्य सामन्यात पहिल्याच षटकांत सात चेंडू टाकत त्याने आणखीन एक चूक केल्याने पहिल्या सामन्यापासून ट्रोल होत असलेल्या अश्‍विनमुळे पंजाबच्या संघाची जास्त चर्चा होताना दिसून येत आहे. त्यातच त्यांच्या संघातील सर्वच फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असून केवळ सलामीच्या जोडीचा प्रश्‍न पंजाबला सतावताना दिसून आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाबला समतोल संघ मैदानात उतरवावा लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, धृव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.