#IPL2019 : चेन्नईसमोर आज दिल्लीचे आव्हान

-बाद फेरीतील सामन्याची रंगीत तालीम
-क्रमवारीतील पहिल्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये वर्चस्वाची लढाई

चेन्नई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात बाद फेरीत दाखल झालेल्या दोन संघांमध्ये सामना होणार असून यात प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेला पहिला संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दुसरा संघ दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान वर्चस्वाची लढाई असणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेल त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी विजयी संघाकडे असेल.

यंदाच्या मोसमात अपेक्षेप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जने बाद फेरी गाठली असून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सात वर्षांनंतर बाद फेरीत आपला प्रवेश निश्‍चित केला आणि बाद फेरीत प्रवेश मिळवणारा तो यंदाच्या मोसमातील दुसरा संघ ठरला आहे. यावेळी दिल्लीच्या संघाने आपल्या 12 सामन्यांमधील 8 सामन्यात विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या संघाचे सध्या 16 गुण असून ते सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहेत.

आजच्या सामन्यात जर त्यांचा विजय झाला तर ते हे स्थान कायम राखतील आणि यानंतरच्या सामन्यात जरी दिल्लीचा पराभव झाला आणि चेन्नईचा विजय झाला तरी चेन्नईला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागेल. तर, चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सर्व प्रथम बाद फेरी गाठली असली तरी त्यांची सरासरी कमी असल्याने त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवून क्रमवारीत अव्वल स्थान कायम मिळवणे आवश्‍यक आहे. कारण, इतर संघाने बाद फेरी गाठण्याबरोबर आपल्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवल्यास चेन्नईच्या संघाला तिसऱ्या अथवा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना एक अतिरिक्‍त सामना खेळावा लागेल.

चेन्नई सुपर किंग्ज Vs दिल्ली कॅपिटल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई

चेन्नईच्या संघात विश्‍वचषकासाठीच्या संघात निवड झालेले तीन खेळाडू असून त्यांच्यातील महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना गत सामन्यात आराम दिला गेला होता. मात्र, तो सामना चेन्नईला गमवावा लागल्याने त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरगुंडी झालेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचा संघ धोनी आणि जडेजा यांचा संघात समावेश करतो का हे पाहणे औत्सुक्‍याचे असून केदार जाधवला विश्‍वचषकापूर्वी आवश्‍यक विश्रांती मिळते का हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.

तर, दिल्लीच्या संघातील एकमेव खेळाडू शिखर धवनची निवड विश्‍वचषकासाठीच्या संघात झालेली असून त्याची कामगिरी पाहता त्याला आजच्या महत्त्वाच्या सामन्यातून वगळण्याची हिंमत दिल्लीचा संघ दाखवणार नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळाल्यास अखेरच्या साखळी सामन्यात त्याला विश्रांती देऊन बाद फेरीसाठीच्या सामन्यासाठी त्याला पुन्हा संघात खेळवण्याचा निर्णय कदाचित संघ व्यवस्थापन घेईल.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

दिल्ली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.