आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळण्याची दिल्लीला संधी
चेन्नई सुपर किंग्ज vs दिल्ली कॅपिटल्स
वेळ – रा. 7.30 वा.
स्थळ – विशाखापट्टणम
विशाखापट्टणम – आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजेत्या संघाचा सामना अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स या संघाबरोबर होणार आहे.
आयपीएलच्या बाराव्या मोसमात नावाबरोबरच भाग्य देखील बदललेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपण “डेअरडेव्हिल’ असल्याचे दाखवून देत आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफ मधील सामन्यात विजय मिळवला असून आता त्यांची गाठ तीन वेळचे विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. यंदाच्या मोसमात साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात चेन्नईच्या संघाने दिल्लीच्या संघाचा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली होती. मात्र, आज दिल्लीच्या संघासाठी करा वा मरा अशी स्थिती असल्याने दिल्लीचा संघ आजच्या सामन्यात कशा प्रकारे कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दिल्लीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या उपान्त्य सामन्यात दिल्ली संघाने चांगल्या गोलंदाजीबरोबरच चांगली फलंदाजी देखील केली होती. त्यामुळे त्यांना उपान्त्य फेरीत हैदराबादच्या संघाचा पराभव करता आला. ज्यात सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील ऋषभ पंतने धमाकेदार खेळी करत संघाला विजयासमीप आणले होते. यावेळी पंतने केलेल्या धमाकेदार खेळीनंतर त्याची निवड विश्वचषकासाठीच्या संघात का केली गेली नाही यावरून अनेक लोकांनी आपली मते मांडली असून पंतची ही खेळी संघ दबावात असताना केली गेली असल्याने त्याच्यामधील प्रगल्भता जाणवली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे त्याला संघाचा विजय होईपर्यंत खेळपट्टीवर टिकाव धरता आला नसल्याने त्याच्यावर टीकादेखील केली जात आहे.
त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे आजच्या सामन्याइतकी दुसरी कोणती सुवर्णसंधी नसणार आहे. त्यामुळे त्याच्यावर आजच्या सामन्यात विजय मिळवून संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्याचे दडपण असणार आहे. दुसरीकडे दिल्लीच्या संघातील जवळपास सर्वच प्रमुख फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असून त्यांच्या संघासाठी केलेल्या धावांमध्ये सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 503 धावा केल्या आहेत.
तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांचा क्रमांक येतो. दोघांनीही 450 धावा केल्या असून चौथ्या स्थानी पृथ्वी शॉचा क्रमांक असून त्याने 348 धावा केल्या आहेत. तर. गोलंदाजांमध्ये त्यांच्या संघाकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांमध्ये कगिसो रबाडा पहिल्या स्थानी असला तरी तो सध्या संघाबाहेर असल्याने दिल्लीचा संघ अडचणीत असताना ख्रिस मॉरिस देखील आजच्या सामन्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता असून त्याने 13 बळी मिळवलेले आहेत.
तर, दुसरीकडे चेन्नईच्या संघाने यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. मात्र, यंदाच्या मोसमात त्यांना मुंबई विरुद्ध झालेल्या तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांना आज एलिमीनेटर सामना खेळावा लागणार आहे. यावेळी चेन्नईच्या संघासमोरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना सातत्याने येत असलेले अपयश हे असणार आहे. कारण, सलामीवीर फाफ ड्यु प्लेसिस आणि शेन वॉटसन या दोघांनीही एक अथवा दोन सामन्यांपूर्तीच चमकदार कामगिरी केली. मात्र, इतर सामन्यांमध्ये त्यांनी साफ निराश केले आहे.
तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सुरेश रैनाला देखील यंदाच्या मोसमात संघाला विजय मिळवून देता येईल अशी कामगिरी क्वचितच करता आली असून अंबाती रायडूनेदेखील यंदा साफ निराशा केली असून चेन्नईची फलंदाजी संपूर्णपणे महेंद्रसिंग धोनीवर अवलंबून आहे. तर, यंदा चेन्नईच्या गोलंदाजांनी मात्र, संघाला तारले असून सर्वच प्रमुख गोलंदाजांनी यंदा संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. ज्यात इम्रान ताहिर, हरभजन सिंग यांची कामगिरी सातत्यपूर्ण असून इतर गोलंदाजांनी देखील आपापली भूमिका चोख बजावलेली आहे.