मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू व यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील एक महागडा खेळाडू दीपक चहर संपूर्ण स्पर्धेलाच मुकणार आहे. दीपक याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पाठदुखीचा त्रास झाला होता. गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार घेत आहे. मात्र, यावेळी त्याची पाठीला झालेली दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नसल्याने त्याला यंदाच्या मोसमातून माघार घ्यावी लागणार आहे.
तो एप्रिलच्या अखेरीस चेन्नई संघात दाखल होईल असे बोलले जात होते. मात्र, आता त्याला माघार घ्यावी लागणार असल्याने चेन्नई संघाला चांगलाच फटका बसला आहे. चेन्नईने दीपकला तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो यंदाच्या आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. चेन्नईने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने गमावले आहेत. त्यामुळे आता त्याच्या जागी दुसरा खेळाडू कोण असेल यासाठी चेन्नईला शोध घ्यावा लागणार आहे.