Chennai Grand Masters 2024 :- जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या भारताचा ग्रँडमास्टर व अव्वल मानांकित अर्जुन इरिगसी समोर देशबांधव विदित गुजरातीचा सामना करणार आहे. इरिगसीने इएलओ 2800 हा मानांकनाचा टप्पा पार केल्यानंतर तो प्रथमच स्पर्धेत खेळणार आहे.
आठ खेळाडूंमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अरविंद चिदंबरमचा सामना इराणच्या अमीन तबाताबेशी, व्हॅचियर लाग्राव्ह मॅक्झिमचा सामना मघसूदलू परम तर अमेरिकेचा ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियनचा सामना ॲलेक्सी शिरोव्हशी होणार आहे. सात फेऱ्यांच्या या स्पर्धेत चॅलेंजर्स ही स्पर्धा देखील होणार असून या स्पर्धेत महिला खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.
हरिका द्रोणवल्ली आणि वैशाली रमेशबाबू हे भारतीय संघाकडून आपले आव्हान सादर करतील. गतवेळचा चॅम्पियन डी. गुकेश चीनच्या डिंग लिरेन विरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद सामन्यासाठी तयारी करत असल्याने तो यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
दरम्यान, ही स्पर्धा 5 ते 11 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. चेसबेस इंडियाच्या सहकार्याने MGD1 द्वारे आयोजित आणि तमिळनाडूच्या क्रीडा विकास प्राधिकरणाने प्रायोजित केलेली ही स्पर्धा अण्णा शताब्दी ग्रंथालयात आयोजित केली जाईल, ज्यामध्ये 1,100 प्रेक्षक बसू शकतील. नोंदणीकृत बुद्धिबळ अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, तर BookMyShow वर सर्वसाधारण प्रवेश तिकिटे रु. 100 मध्ये उपलब्ध आहेत.