दिल्लीचा पराभव करत चेन्नई अव्वलस्थानी

चेन्नई: फाफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीयांच्या फटकेबाजीनंतर इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांची पराभव करत क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 179 धावांची मजल मारत दिल्लीसमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीला 16.2 षटकांत सर्वबाद 99 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना तब्बल 80 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

चेन्नईने ठेवलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्याच षटकांत माघारी परतला. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत 5 व्या षटकातच दिल्लीचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र, हरभजनने शिखर धवनला 19 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर ताहीर आणि जडेजाने ऋषभ पंत आणि कॉलिन इनग्रामला पाठोपाठ बाद करत दिल्लीला सलग तीन धक्के दिले. त्यामुळे 5 व्या षटकात 1 बाद 52 धावांवर असलेल्या दिल्लीची अवस्था 7 षटकात 4 बाद 65 धावा अशी बिकट झाली होती. यानंतर ताहीरने अक्षर पटेल आणि रुदरफोर्ड यांना स्वस्तात माघारी धाडले. तर, जडेजाने पहिल्यांदा मॉरिस आणि नंतर 44 धावा करुन एकाकी लढत देणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरला धोनीकरवी बाद करत दिल्लीच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या.

यावेळी ताहीरने 4 बळी तर जडेजाने 3 आणि हरभजने 1 बळी मिळवत दिल्लीला पराभवाच्या खाईत लोटले.
तत्पूर्वी, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शेन वॉट्‌सनला जगदीश सचितने शुन्यावर बाद करत त्यांना पहिला धक्का दिला. वॉट्‌सन बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैना आणि ड्युप्लिसिस यांनी सावध फलंदाजी केली. दोघांनी 10 षटकांत फक्त 53 धावा केल्या.

खेळपट्टीवर जम बसल्यानंतर रैना आणि ड्युप्लिसिसने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. संथ फलंदाजी करणारा ड्युप्लिसिस आक्रमक खेळण्याच्या नादात41 चेंडूत 39 धावांची खेळी करुन बाद झाला. मात्र रैनाने 37 चेंडूत 59 धावा करुन संघाला शंभरी ओलांडून दिली.

रैना बाद झाला त्यावेळी चेन्नईच्या 15 षटकांत 3 बाद 102 धावा झाल्या होत्या. मात्र, यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जडेजाने अखेरच्या 5 षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. जडेजाने 10 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारंच्या मदतीने 25 धावा करत चेन्नईला 150 च्या जवळ पोहचवले. जडेजा बाद झाल्यानंतर अखेरच्या दोन षटकात धोनीने फटकेबाजी करत चेन्नईला 179 धावांपर्यंत पोहचवले. धोनीने 22 चेंडूत 44 धावा केल्या यावेळी त्याने ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकात तब्बल 21 धावा केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.