दुबई – महेंद्रसिंह धोनी याने आपल्या लौकिकाला जागत बेस्ट फिनिशर आपणच हे दाखवून देताना अखेरच्या षटकांत चेन्नई सुपर किंग्जला दिल्लीवर 4 गडी राखून विजय मिळवून देताना यंदाच्या आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठून दिली.
दिल्लीने विजयासाठी ठेवलेले 173 धावांचे आव्हान पार करताना सुरुवातीला चेन्नईला फाफ डुप्लेसीच्या बाद होण्याने फटका बसला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथप्पा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली. हे दोघे खेळपट्टीवर असताना चेन्नईचा विजय सोपा वाटत होता. मात्र, अर्धशतक झाल्यावर उथप्पा बाद झाला. त्याने 44 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत 63 धावांची खेळी केली. ऋतुराजनेही अर्धशतकी पल्ला पार केला.
मात्र, 19 व्या षटकांत ऋतुराजचा संयम सुटला व त्याने उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्यावेळी बेस्ट फिनिशर व कर्णधार धोनी खेळपट्टीवर आला व त्याने आपल्या हाती सूत्रे घेत चौकार व षटकारांची आतषबाजी करत संघाचा विजय साकार केला. धोनीच्या खेळीतील जोश इतका जबरदस्त होता की त्यापुढे उथप्पा व ऋतुराजची खेळीही धूसर बनली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 18 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. दिल्लीकडून टॉम कुरेनने 3 गडी बाद केले.
सलामीवीर पृथ्वी शॉ व कर्णधार ऋषभ पंत यांच्यासह शेमरन हेटमायर यांनी केलेल्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 173 धावा करण्याचे आव्हान ठेवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पर्वातील या क्वालिफायर 1 लढतीत विजय मिळवून थेट अंतिम फेरी गाठण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर व अक्सर पटेल यांनीही निराशा केली. दुसऱ्या बाजूने पृथ्वी शॉ याने मात्र, चेन्नईच्या गोलंदाजीवर आक्रमण केले.
यंदाच्या स्पर्धेत त्याची बॅट प्रथमच तळपली. त्याने केवळ 27 चेंडूत अर्धशतक फटकावले. त्यानंतरही तो त्याच ढंगात खेळत असतानाच बाद झाला. त्याने आपल्या 60 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. त्यानंतरही दिल्लीची अवस्था 4 बाद 80 अशी बिकट बनली होती.
त्याचवेळी कर्णधार पंत व हेटमायर ही जोडी एकत्र आली व त्यांनी घणाघाती फलंदाजी करत डाव तर सावरलाच पण संघाला आश्वासक धावसंख्या उभारून दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 83 धावांची बहुमोल भागीदारी केली व संघाचे दीडशतक फलकावर लावले. अखेरच्या षटकांमध्ये धावांचा वेग आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात हेटमायर 37 धावांच्या खेळीत 24 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 1 षटकार फटकावून बाद झाला.
त्यानंतर अखेरच्या षटकात पंतने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने 35 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. चेन्नईकडून जोश हेझलवूडने 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजा, मोईन अली व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 172 धावा. (पृथ्वी शॉ 60, शेमरन हेटमायर 37, ऋषभ पंत नाबाद 51, जोश हेझलवूड 2-29, रवींद्र जडेजा 1-23, मोईन अली 1-27, ड्वेन ब्राव्हो 1-31). चेन्नई सुपर किंग्ज – 19.4 षटकांत 6 बाद 173 धावा. (ऋतुराज गायकवाड 70, रॉबिन उथप्पा 63, मोईन अली 16, महेंद्रसिंह धोनी नाबाद 18, रवींद्र जडेजा नाबाद 0, टॉम कुरेन 3-29, अनरीच नोर्जे 1-31, आवेश खान 1-47.)