Chef Vishnu Manohar – अयोध्येतील ७ हजार किलोचा “राम हलवा’, सर्वात मोठा व्हेज कबाब, सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी पुरणपोळी, ५२ तासांची नॉन-स्टॉप कुकिंग मॅरेथॉन असे विविध २५ विश्वविक्रम आपल्या नावावर करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच रविवार २७ ऑक्टोबर रोजी ते सलग २४ तास डोसे बनविण्याचा विश्वविक्रम करणार आहेत. स्वत: विष्णू मनोहर यांनी ही माहिती दिली.
यावेळी प्रवीण मनोहर, मिलिंद देशकर यांची उपस्थिती होती. विष्णूजी की रसोई परिसर, बजाज नगर, नागपूर इथे सकाळी ८ वाजता विष्णू मनोहर दोसे तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करतील आणि पुढचे २४ तास म्हणजे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत साधारणपणे ५ ते ६ हजार डोसे तयार करून या आगळ्या-वेगळ्या विश्वविक्रमावर आपले नाव कोरणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमात तसे पाहता त्यांच्या नावे दोन विश्वविक्रम नोंदवले जातील. पहिला विश्वविक्रम न थांबता २४ तास दोसे बनविणे तर दुसरा विश्वविक्रम २४ तासात जास्तीत जास्त डोसे बनविणे असा असेल.
यासाठी तीन तवे राहणार आहे. एका तव्यावर एका तासात साधारणत: १२५ ते १५० डोसे तयार होतील. गरज भासल्यास चवथा तवाही लावण्यात येईल असे विष्णू मनोहर यांनी सांगितले.
विष्णू मनोहर यांनी तयार केलेले दोसे खायला वेगवेगळ्या संस्थांना आमंत्रित केले जाणार आहेत. त्यात अंधविद्यालय, स्पेशल मुलांच्या शाळा, तृतीयपंथियांचा संघ, अनाथाश्रम, मुकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम यांचा समावेश राहणार असून, याशिवाय इतर मंडळीदेखील दोस्याचा आस्वाद 24 तास घेऊ शकतील. डोस्यांबरोबर चटणीदेखील दिली जाणार आहे.
विश्वविक्रमी डोस्यासाठी साहित्य
१०० किलो-उडद दाळ (खास कर्नाटकातली घोडा नंबर १), ३०० किलो-तांदूळ (खास डोस्याचे तांदूळ), ३५ किलो-मेथी दाणे, ५० किलो-पोहे, २०० किलो-शेंगदाणा तेल, २०० किलो-चटणीसाठी खोबरे, १०० लिटर-दही, १०० किलो-डाळव, ५० किलो-लाल मिर्ची, ५ किलो-हिंग, ५ किलो-मोहरी, ५० किलो-मिठ, २५ किलो-कोथींबिर, ५० किलो-साखर व ५० किलो-कढीपत्ता