सासवडमध्ये राजकीय स्थितीही फिरल्याची चर्चा
सासवड – महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सकाळी राजकीय भूकंप होणारी ठरली. राज्यपालांपुढे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजकारणात कधीही एकत्र न येणारी ही दोन टोके एकत्र आल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. परंतु, या निर्णयाचे फडणवीस तसेच अजित पवार समर्थकांनी स्वागत केले.
पुरंदर भाजपच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत. सासवड शहरातील भाजप पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाई वाटली. पुरंदर भाजपतर्फे केलेल्या या जल्लोषात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय तसेच चर्चेची बाब ठरली. पुरंदर राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा आहे का? अशी चर्चा नागरिकांत होती.
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा जल्लोष पुरंदर भाजपाकडून जोरदार करण्यात आला. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा चिटणीस आर. एन. जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य गिरीश जगताप, आनंद जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष एम.के.गायकवाड आदी उपस्थित होते.
पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट?
पुरंदर भाजपने केलेल्या जल्लोषात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे यांना संपर्क केला असता आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत, असे त्यांनी सांगितले. तर, माजी अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी अजित पवार यांच्या भूमिकेशी ठाम असल्याचे भाजपच्या जल्लोषातून दिसले. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली.