कोयनानगर – कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार होण्यासाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालाकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सदरचे काम तातडीने चालू करून कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग चकाचक करा, असे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे चुलते सुभाषराव तानाजीराव देसाई यांचे निधन झाल्यामुळे ना. देसाई यांचे सर्व कार्यक्रम तीन दिवस रद्द करण्यात आले आहेत. मात्र, कुटुंबातील या दु:खद प्रसंगीही ना. देसाईंनी कार्यतत्परता दिसून आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, पाटण तालुक्यातील महत्त्वाचे व नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न यांविषयी पालकमंत्र्यांनी गुरुवार दि. 15 रोजी सातारा येथील निवासस्थानी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावले.
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झाली असून पाटण तालुक्यात दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देवून ज्याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीकरण आवश्यक आहे, तेथे डांबरीकरणातून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. यात विहे घाटातील डांबरीकरण, मल्हारपेठ येथील क्रॉंक्रीटीकरण, नवसरी येथे डांबरीकरण, नाडे, अडूळ, म्हावशी येथील क्रॉंक्रीटीकरणाचे काम आठ दिवसांच्या आत सुरू करून तातडीने पूर्ण करा. तसेच पाटण ते संगमनगर धक्का आणि संगमनगर धक्का ते घाट माथा या रस्त्याचे काम डांबरीकरणातून तातडीने पूर्ण करून महामार्ग वाहतूकयोग्य करावा. या रस्त्याच्या निविदेची फेरप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून 6 महिन्यांच्या आत काम सुरू करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
महत्त्वाचे म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एल अँड टी कंपनीने तातडीने काम सुरू करून रस्ता वाहतूकयोग्य करण्याचे मान्य केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही आजच सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सातारा पोलीस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाला हस्तांतरित करण्यासंदर्भात आढावा घेऊन महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी समन्वयाने चर्चा करून याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी यांनी साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लागणारी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे, एल अँड टी कंपनीचे परेश वारुळे, रवींद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रश्नाबाबत दै. प्रभातने याप्रश्नी पालकमंत्री देसाई यांचे लक्ष वेधले होते. त्यांनतर पालकमंत्र्यांनी याची दखल घेत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सदरची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दै. प्रभातचे पाटण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.