अभियांत्रिकीनंतर आता विज्ञान विद्याशाखा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचा पुढाकार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकीनंतर आता विज्ञान विद्याशाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्यासाठी पाऊल उचलले आहे. येत्या मार्च 2020 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विज्ञान शाखेची सर्व उत्तरपत्रिका तपासणी ऑनलाइनद्वारे होणार असल्याने निकालासाठी लागणारा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीचा निर्णय घाईघाईत घेतला. मात्र, उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीच्या प्रक्रियेचा पूर्णपणे फज्जा उडाला. हा अनुभव लक्षात घेऊन पुणे विद्यापीठाने उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीची प्रक्रिया टप्प्याटप्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विज्ञान शाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उत्तरपत्रिका ऑनलाइनद्वारे घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
परीक्षा विभागाच्या सुधारणा समितीने ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय सूचविला. तसा प्रस्ताव 9 सप्टेंबरच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला असून, त्यास मान्यताही मिळाली. या प्रक्रियेच्या अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव येत्या 14 तारखेला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
विद्यापीठाकडून यापूर्वीच पदव्युत्तरच्या अभियांत्रिकी शाखेची उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासली जात आहे. सन 2016 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आता या प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे विज्ञान शाखेसाठी विशेषत: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितसह अन्य विषयांच्या उत्तरपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइनद्वारे तपासली जाणार आहे. विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका संख्या 1 लाखांच्या आसपास आहे. अशाप्रकारे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व शाखेची उत्तरपत्रिका भविष्यात ऑनलाइनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
निकाल वेळेत लागेल
ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याच्या प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार आहे. यात प्रत्येक महाविद्यालयात कॅप सेंटर असेल. त्या महाविद्यालयातील प्राध्यापक तेथे बसूनच उत्तरपत्रिका तपासतील. त्यामुळे विद्यापीठाकडून देण्यात येणारे प्रवास खर्च, महागाई भत्ताही बंद होईल. परिणामी, ही प्रक्रिया वेगात होणार असल्याने निकालही मुदतीपूर्वीत लागेल.
पुनर्मूल्यांकन निकालही लगेच
ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सर्वच डाटा विद्यापीठाने तयार असणार आहे. त्यामुळे फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकन निकालासाठी लागणारा वेळ निम्म्याने कमी होणार आहे. त्यामुळे आठवडा ते पंधरा दिवसांत त्याचे निकाल विद्यार्थ्यांच्या हातात पडेल, अशी व्यवस्था याप्रक्रियेने होणार आहे.
विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विज्ञान शाखेची उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेण्यात येत आहे. याबाबत चर्चाही आणि चाचपणी घेण्यात आली. मात्र, ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ