यवतमाळ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे वणी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ विराट सभा घेतली. या सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलिपॅडच्या ठिकाणी तपासल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. जाहीर सभेतूनही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? त्यांनी इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे. मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडीओ मला आला पाहिजे. तिथे तुम्ही शेपूट घालू नका. हा व्हिडीओ मी रिलीज करत आहे. माझं युरीन पॉट पण तपासा.
Fuel ची टाकी वगैरे काही तपासायची आहे का?
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक कोणत्या शासकीय नोकरीत आहे. हे देखील पाहून घ्या. या बॅगेतील काही पाहिजे असेल तर घ्या. तुम्हालाही तहान लागली असेल. तुम्ही पण माणसं आहात. Fuel ची टाकी वगैरे काही तपासायची आहे का? असा सवालही ठाकरेंनी केला. याशिवाय उद्धव ठाकरेंनी कॅमरामनला प्रश्न केले आहेत. तुम्ही मध्य प्रदेशचे आहात. गुजरातचे तर नाहीत. म्हणजे बॅगा तपासण्यासाठी देखील बाहेरच्या राज्यातील माणसं आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
माझी बॅग तपासली तशी मोदी आणि अमित शाहांचीही बॅग तपासा –
बॅग तपासण्यात आल्यानतंर झालेल्या सभेतही बॅग तपासणीच्या मुद्द्याला हात घातलाय. ‘माझी बॅग तपासली तशी मोदी आणि अमित शाहांचीही बॅग तपासा’, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलंय, तसंच मिंधे आणि टरबूज यांचीही बॅग तपासणार का, असा सवाल देखील त्यांनी आयोगाला केला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
– 20 तारखेला डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका. आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढलेली आहे, तुम्हालाही डोळसपणे मतदान करायचे आहे.
– सभेसाठी हेलिकॉप्टरने आल्यावर 8-10 जण स्वागतासाठी उभे होते. बॅग तपासली, त्यांचा व्हिडीओ काढला. तुम्हालाही चौकशीसाठी, तपासणीसाठी अडवले तर त्यांचे ओळखपत्र, नेमणूकपत्र तपासा, त्यांचेही खिसे तपासा. हा मतदात्याचा मुलभूत अधिकार आहे.
– अदानी हा राक्षस मुंबईपुरता नाही. चंद्रपूरची शाळाही अदानीला दिली. देशातील सगळे प्रमुख एअरपोर्ट, पोर्ट अदानीकडे दिले.
– मोदी, शहा इकडे फिरताहेत. हिंदू- मुसलमान दंगे भडकावण्याचा प्रयत्न करताहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणतात, पण हम बटेंगे भी नही, कटेंगे भी नही, हम आपको लुटने भी नही देंगे. हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे ही भाजपची नीती आहे.
– स्वत: मोदींना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मत मागावे लागत आहेत. ही आपल्या बाळासाहेबांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचे कर्तुत्व आहे.
– महाराष्ट्रामध्ये खोटी मोदी गॅरंटी चालत नाही. इकडे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाणे खणखणीत चालते.
– कश्मीरमध्ये जाताय तसे मणिपूरला का गेला नाहीत? तिथे आजही अत्याचार चालू आहेत. मोदी, शहा इकडे भाषण देत असताना मणिपूरमध्ये महिलेवर अत्याचार करून जिवंत जाळून टाकण्यात आले. मोदी त्याबाबत बोलत नाहीत.
– गांडुळांची पैदास महाराष्ट्रात होत नाही, महाराष्ट्रामध्ये वाघांची पैदास होते
– महाराष्ट्रात महिला अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असणारे महिलांसाठीचे पोलीस स्टेशन उभारणार
– शेतकऱ्याचे नुकसान होऊ न देता जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेऊन दाखवणार.
– निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार
– मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार
– महाराष्ट्रातून गुजरातला लुटून नेलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणणार
– सरकार आल्यावर अदानीच्या घशामध्ये घातलेली मुंबई आणि आसपासची जमीन काढून महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घर देऊन दाखवणार