“व्हिजीटर पास’ची सुविधा महिनाभर बंद
पुणे – लोहगाव विमानतळाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमान उड्डाणाच्या किमान दोन तास आधी “चेक-इन’ करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. याबाबत प्रशासनाने ट्वीटरवरदेखील माहिती दिली. हा बदल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर “ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’ने (बीसीएएस) देशभरातील विमानतळांना “हाय अलर्ट’ घोषित केला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने लवकर “चेक इन’ करण्याचे आवाहन केले आहे.
विमानतळांवर सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचा एक भाग म्हणून विमानतळावर प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेत वेळ लागण्याची शक्यता असते. परिणामी, प्रवाशांनी नियोजित वेळेच्या आधी येणे, त्यांच्या सोयीचे ठरते. दरम्यान, विमानतळावर शुल्क आकारून दिले जाणारे “व्हिजीटर पास’ही या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे त्यांचे नातेवाईक, मित्र यांना टर्मिनल बाहेरूनच परतावे लागणार आहे.