पालिकेची कारवाई होणार तीव्र : आणखी 50 जणांना नोटीस बजावणार
पुणे – मिळकतकर थकविल्यानंतर महापालिकेची मिळकत जप्तीची कारवाई टाळण्यासाठी शहरातील काही मिळकतधारकांकडून पालिकेस धनादेश दिले जातात. मात्र, अनेक मिळकतधारकांचे धनादेश वारंवार बाउंस होत असल्याने पालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत अशा महाभागांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीनंतर पालिकेने एकाच दिवशी तब्बल 80 जणांना धनादेश बाऊंसप्रकरणी नोटीस बजाविली असून सुमारे 20 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; तर आणखी 50 जणांना पुढील आठवड्यात नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, ज्या मिळकतकरधारकांचे धनादेश बाऊंस झाले आहेत त्यांनी तातडीने कराची रक्कम भरून पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागास वर्षाला सुमारे दीड ते 2 लाख मिळकतधारकांची रक्कम धनादेशाद्वारे येते. त्यातील जवळपास 3 ते 4 हजार करदात्यांचे धनादेश बाऊंस होतात, त्यातील बहुतांश धनादेश हे कारवाई टाळण्यासाठी खात्यात पैसे नसतानाही महापालिकेस दिले जातात. त्यामुळे धनादेश बाउंस होणे, पुन्हा पालिकेची नोटीस येणे यात महिन्याभराचा कालावधी मिळत असल्याने अनेक थकबाकीदार पालिकेच्या अडचणीचा गैरफायदा घेतात, अशा थकबाकीदारांची यादीच पालिकेकडून तयार करण्यात येत असून वारंवार धनादेश बाऊंस होणाऱ्या तसेच मोठे धनादेश देऊन पालिकेस फसविणाऱ्यांवर आता पालिका थेट फौजदारी गुन्हाच दाखल करणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच पालिकेने जवळपास 20 जणांना नोटीस देत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला होता. मात्र, त्यानंतरही हे प्रमाण वाढतच असल्याने पालिकेने याची गंभीर दखल घेत ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.