पुणे – चेन्नई, बंगळूरु, आंध्र प्रदेश या भागांत धर्मगुरू म्हणून प्रसिध्द असलेल्या अम्मा भगवान यांच्या नावाचा फायदा घेऊन त्यांच्या जवळच्या सेवकांनी महाराष्ट्रातील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. अंतिद्रीय शक्तीचा धाक दाखवून हजारो भक्तांची शारीरिक, मानसिक, आर्थिक फसवणूक केली आहे, असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
जाधव म्हणाल्या, “ऑनलाइन दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, हवन, नवनवीन प्रोसेस निर्माण करून तसेच होम, हवन, पूजा केली नाही तर आर्थिक नुकसान होईल, घरावर वाईट संकट येईल असा धाक दाखवून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेला आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या फसवणूकप्रकरणी सांगवी, मोशी, हडपसर, चिखली या ठिकाणी भारतीय दंड संहिता कलम 420,34 या नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात इतरही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.’ फसवणूक करणाऱ्यांमध्ये निवेदना ऊर्फ वाय माधवी, अस्मीता अनिलराव, राधा ऊर्फ वैशिष्ठा,त्यांचे सहकारी ऍड. वसंत पाटील, संगीता भिसे, रुपाली फलटणे, सीमा तुपे व वृषाली देसाई यांचा समावेश आहे.