पुणे – खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची 55 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर वैभव महेश (रा. कृष्णानगर, मध्य प्रदेश) आणि जयंत सिंग तोमर (रा. गोरेगाव, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक कोंढवा भागातील एनआयबीएम रस्त्यावर वास्तव्यास आहेत. व्यावसायिकाने खासगी दूरचित्रवाहिनीवरील एका मालिकेत बालकलाकारांना संधी अशा आशयाची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावरून त्याने वैभव महेश आणि जयंतसिंग तोमर असे नाव सांगणाऱ्या आरोपींबरोबर संपर्क साधला. व्यावसायिकाच्या बारा वर्षीय मुलीला हिंदी मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याचे आमिष दोघांनी दाखविले होते.त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने व्यावसायिकाने आरोपींच्या खात्यात 55 हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी तोमर आणि महेश यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
तेव्हा आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार तपास करत आहेत.