खासगी रुग्णालयांत स्वस्त उपचार

करोनाच्या पार्श्‍वभूमीवरील आदेशाला राज्य सरकारची मुदतवाढ

पुणे – राज्यात अजूनही करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार करण्याच्या आदेशाला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयांना अजूनही करोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करावेच लागणार आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने हा सुधारित आदेश काढला आहे. हा आदेश 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहणार आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील करोनाबाधितांच्या उपचारासाठीचे नियम ठरवणारा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिलमध्ये काढला होता.

त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषंगाने खासगी रुग्णालयांना राज्य सरकारने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे याचे नियंत्रण करण्याचे अधिकार राज्यसरकारने दिले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर ती जबाबदारी राहणार आहे.

कारवाईही होणार
करोनाबाधित रुग्णांसाठी राज्य सरकारने सुरुवातीलाच निश्‍चित करून दिलेली दर आकारणीही फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे कोणतेही कारण सांगून जर उपचार नाकारले किंवा जास्त दर आकारले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा इशाराही यातून देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.