खासदार संजय मंडलिक यांची केंद्राकडे मागणी
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- कोरोना विषाणुमुळे देशातील शाळा, महाविद्यालये हे अनियमीत कालावधीकरीता बंद करण्यात आले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता शाळा महाविद्यालयाकडून ऑानलाईन पध्दतीने शिकवले जात आहे. वारंवार मोबाईलच्या वापराने विद्यार्थ्यांना मानेच्या व डोळ्यांच्या विकाराच्या तक्रारी वाढल्याने या विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरीता केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेतून कमीत कमी बारा इंचाचा टॅबलेट उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल व माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकेड तातडीच्या निवेदनाव्दारे केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, कोरोना विषाणुंमुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकरीता ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र महत्वाचे असल्याकारणाने सतत मोबाईलव्दारे ऑानलाईन अभ्यास केल्याने त्यांच्या डोळ्यांवर व मानेवर परिणाम होवू लागला आहे. याकरीता, केंद्राने या विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता कमीत कमी 12 इंचाचा मेक इन इंडिया अंतर्गत कमी किमंतीमध्ये टॅबलेट उपलब्ध करुन द्यावा. तसेच, दुर्गम व डोंगराळ ठिकाणी मोबाईल टॅावर व इंटरनेट कनेक्टिव्हिटी नीट मिळत नसलेकारणाने या टॅबलेटमध्ये शासकीय दूर संचार विभागाकडून इनबिल्ड इंटरनेट कार्ड दिल्यास बीएसएनएल, एमटीएनएल यासारख्या कंपन्यांना करोडो ग्राहक वर्ग मिळून त्यांना उर्जीत अवस्था निर्माण होईल आणि आत्मनिर्भर भारत म्हणून या टॅबलेटचे हार्डवेअर बनवल्याने भारतीय हार्डवेअर इंडस्ट्रीला मोठा उद्योग मिळणार आहे.
यामध्ये सरकारने आपला सहभाग म्हणून विक्री होणाऱ्या टॅबलेटवर पुर्णपणे जीएसटी माफ करावी तसेच ज्या पालकांना एक रक्कमी टॅबलेट खरेदी करणे शक्य नसेल अशा पालकांकरीता राष्ट्रीयकृत बँकाकडून सूलभ हफ्त्यामध्ये कर्ज उपलब्ध करुन द्यावे. आत्मनिर्भर भारत योजनेमधून हा टॅबलेट तत्काळ बाजारात आणल्यास यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, भारतीय हार्डवेअर इंडस्ट्रीजला मोठा उद्योग व बीएसएनएल कंपनीला उभारी मिळणार असल्याकारणाने सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केली आहे.