मॅचफिक्सिंग प्रकरण चौकशी
नवी दिल्ली : जागतिक क्रिकेटला हादरवून टाकणारे मॅचफिक्सिंग प्रकरण 2000 साली उजेडात आले होते. त्यात मुख्य सूत्रधार असलेल्या सट्टेबाज संजीव चावला याला नुकतीच अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडील चौकशीतून बाहेर येणारे तथ्य अनेक व्यक्तींचे खरे चेहरे उघड करणार असल्याचे व्यक्त केले जात आहे.
चावलाची चौकशी व त्याचा जबाब अनेक प्रतिष्ठितांसाठी धोकादायक ठरेल असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दैनिक प्रभातशी बोलताना दिले आहेत. हा पदाधिकारी 2000 साली मंडळात कार्यरत होता. दक्षिण आफ्रिका संघ 2000 साली भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी संघाचा तत्कालीन कर्णधार हॅन्सी क्रोनिए याने चावलाच्या मदतीने संघातील काही खेळाडूंना आपल्या बाजूने ओढून सामने फिक्स केले होते.
त्यावेळी क्रोनिएने किंग आणि माधवन समितीसमोर दिलेल्या कबुलीजबाबात दक्षिण आफ्रिका तसेच भारतीय संघातीलही खेळाडूंचा सहभाग असल्याचे सांगून मोठा धमाका केला होता. माजी कर्णधार महंमद अजरुद्दीन, अजय शर्मा, निखील चोप्रा, नयन मोंगीया व अजय जडेजा यांच्यावर क्रोनिएने तसेच माधवन समितीने ठपका ठेवला होता.
त्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कारवाई केली होती. शर्मा, चोप्रा, जडेजा व मोंगीया यांनी पाच वर्षांची बंदी भोगली होती. अजरुद्दीनला तहहयात बंदी लावली गेली होती, मात्र नंतर पुन्हा केलेल्या चौकशीतून काही ठोस निष्पन्न न झाल्याने त्याला न्यायालयाने क्लीनचिट दिली होती. मात्र या क्रिकेटपटूंबरोबरच क्रोनिएने दक्षिण आफ्रिका संघातील निकी बोए,
हर्शेल गिब्ज यांचीही नावे घेतली होती. त्यावेळी या खेळाडूंनी अटकेच्या भीतीने भारताचे नंतरचे दौरे टाळले होते. अर्थात पुरावाच नसल्याने या दोघांची नावे चार्जशिटमधून नंतर वगळण्यात आली होती. क्रोनिएवर तहहयात क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती, मात्र एका विमान अपघातात क्रोनिएचे निधन झाले आणि सर्व चौकशी तिथेच थांबली. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार चावला याच्या अटकेचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले होते.
अखेर ब्रिटन सब गुन्हेगार हस्तांतरण करार झाल्याने त्याचा ताबा गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी घेतला व त्याला भारतात आणले. न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी दिली व आता त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून पुन्हा एकदा भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये त्सुनामी येण्याचे संकेत आहेत.
डीसीपी रामगोपाल नाईक यांच्यासह दिल्ली क्राईम ब्रॅंचचे पथक चावलाची चौकशी करत आहे. या मॅचफिक्सिंग प्रकरणात अनेक क्रिकेटपटूंची नावे आली होती. आता देखील चावलाच्या चौकशीमध्ये काही प्रतिष्ठित क्रिकेटपटूंची तसेच काही सेलीब्रिटींची नावे समोर येणार आहेत.