आवश्यक पूर्वपरवाने न घेतल्याचा पालिकेचा ठपका
पुणे – सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळील चव्हाण हॉस्पिटलच्या संचालकांची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी दिले आहेत.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पूर्वपरवाने त्यांनी घेतले नाहीत. असे असतानाही त्यांनी हे रुग्णालय सुरू करून तेथे रुग्णांना दाखल करून घेतले आहे. परवानगी नसतानाही हे रुग्णालय सुरू केल्याने ते रुग्णाच्या जिवाशी खेळून आर्थिक लूट करत आहेत, अशी त्यांच्याबाबत तक्रार आहे. त्याची चौकशी करण्याचे हे आदेश आहेत.
येथील दत्तनगरमधील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणाऱ्या शिवराज राम भवळ यांचा 29 मार्च रोजी मृत्यू झाला. त्यांना चव्हाण रुग्णालयातून नवले रुग्णालयात शिफ्ट करायचे होते. परंतु या रुग्णालयातील लिफ्टचे काम अपूर्ण असल्याने त्यांना बाहेर पडण्याला उशीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
त्यामुळे या रुग्णालयाची चौकशी करून संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदूम आदींनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.