तरुण विजय
माजी राज्यसभा सदस्यपाकिस्तानात हिंदू कसे जगतात, हे मी पाहिलेले आहे. देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष वर्गाला पाकिस्तानातील हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत नाहीत. पॅलेस्टाइन आणि सीरियात होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलणारे लोकही पाकिस्तानातील हिंदूंबद्दल अवाक्षर काढत नाहीत. रीना आणि रवीना या दोन मुलींच्या संदर्भात नुकत्याच घडलेल्या घटना मानवी मूल्यांचे राक्षसीकरण झाल्याचे सूचित करतात; परंतु या अत्याचारग्रस्तांची दखल घेण्यास सवड कुणाला आहे?
पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या घडामोडी मानवी मूल्यांचे राक्षसीकरण झाल्याचे सूचित करतात. ज्या मुलींच्या संदर्भात या घडामोडी घडल्या, त्या शत्रूच्या मुली असत्या, तरी भारत त्यांच्या संरक्षणार्थ उभा राहिला असता. या विषयावर भारताने ठाम भूमिका घेतली नाही, भाष्य केले नाही तर भारत आपली मूळ ओळखच हरवून बसेल. 13 वर्षांची रवीना आणि 15 वर्षांची रीना या दोन चिमुकल्या मुली पाकिस्तानात हिंदू म्हणून जगण्याची “शिक्षा’ भोगत आहेत. भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष माध्यमे जेव्हा पाकिस्तानातील घटनांचे वार्तांकन करतात, तेव्हा पाकिस्तानी हिंदूंवर होणारे अत्याचार कदाचित त्यांना दिसत नसावेत. त्याकडे ते पाहात नाहीत, त्याविषयी बोलत किंवा लिहीत नाहीत. पाकिस्तानातील हिंदूंनी फाळणीची मागणी केली नव्हती किंवा या मागणीचे समर्थनही केले नव्हते. आपल्या मातृभूमीवर निष्ठा ठेवून ते तिथेच राहिले. त्यांना त्यांचे मतही कुणी विचारले नव्हते.
1947 मध्ये जर संपूर्ण लोकसंख्येची अदलाबदल झाली असती, तर तेथील हिंदू माता-पित्यांना आपल्या बाहुलीसारख्या नाजूक मुलींचे आक्रंदन ऐकावे लागले नसते. स्वातंत्र्याच्या आंदोलनाने थकलेल्या त्यांच्या पूर्वजांचा हाच “गुन्हा’ ठरला. ब्रिटिशांच्या षड्यंत्रापुढे त्यांनी पराभव स्वीकारला. या षड्यंत्रामुळे भारतात असा एक वर्ग त्यावेळी तयार झाला ज्यांना सीरिया, पॅलेस्टाइन किंवा अन्य देशांमधील मानवाधिकारांची काळजी अधिक आहे; परंतु हिंदूंपासून मात्र ते संवेदनहीन अंतर राखून आहेत. रवीना, रीना आणि रिंकल यांच्यासारख्या मुलींच्या आक्रंदनापुढे आणि त्यांच्या माता-पित्यांच्या शुष्क डोळ्यांपुढे पक्ष, विचारधारा, घोषणा आणि पराक्रमाचे गोडवे गाणारे सर्व शब्द पोकळ ठरतात. गुरू तेग बहादूर, राणा प्रताप आणि छत्रपती शिवरायांचे केवळ नाव घेतले जाते.
काश्मीरचे पंडित पंजाबी नव्हते; परंतु त्यांच्या रक्षणासाठी गुरू तेग बहादूर, भाई मतिदास, भाई सतिदास यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. निवडणुकीत मते मागितली नव्हती. मला बारा वेळा पाकिस्तानात जाण्याची संधी मिळाली. तेथील सर्व प्रमुख क्षेत्रे आणि ठिकाणांचे भ्रमण मी केले आहे. “ग्रेट पाकिस्तानी हॉस्पिटॅलिटी’च्या चर्चा करणाऱ्यांच्या सोबतही प्रवास केला आहे. हिटलरच्या काळात ज्यूंना ज्याप्रमाणे शोधून-शोधून लक्ष्य केले जात होते, तशीच काहीशी अवस्था पाकिस्तानातील हिंदूंची आहे. कराचीत क्लिफ्टन समुद्रकिनाऱ्यावर एक शिवमंदिर आहे. रत्नेश्वर महादेवाचे ते मंदिर एकेकाळी भव्य आणि लोकप्रिय असेल.
आज तेथील पुजारी मुस्लीम टोपी परिधान करून पूजा करतात. गर्दीत मुस्लीम बनून राहणे हेच हिंदूंसाठी सुरक्षाकवच आहे. महिलांनी कपाळावरील कुंकू आणि मंगळसूत्राचा त्याग केला, जेणेकरून घराच्या बाहेर पडल्यावर कुणी हिंदू म्हणून त्यांना ओळखू नये. अंत्यसंस्कारांसाठीही अनेक खटपटी आणि प्रयत्न केल्यानंतर जागा मिळते. अनेकदा ही जागा शंभर किलोमीटरपेक्षाही दूर असते. कारण अंत्यसंस्कारामुळे तेथील लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो. शाळांमध्ये सामान्यतः पन्नास मुस्लीम तर चार हिंदू मुले असतात. त्यांना दररोज “काफीर’ हा शब्द ऐकावा लागतो. हनुमान, दुर्गा, राम अशा देवदेवतांची अत्यंत असभ्य भाषेत टिंगल केली जाते.
तक्रार तरी कशी आणि कुठे करणार? त्यांना मतदानाचा किंवा समान राजकीय अधिकार नाही. केवळ हिंदू मतदारसंघांमध्येच ते मतदान करू शकतात. पाकिस्तानातील बहुतांश ख्रिश्चन हे हिंदूंमधून धर्मांतर झालेले ख्रिश्चन आहेत. मुस्लीमसुद्धा अरबस्थानातून आलेले नाहीत. तेथील लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे पूर्वज जाट हिंदूच होते. परंतु पाकिस्तानातील ख्रिश्चनांना अमेरिका आणि युरोपीय देशांचे संरक्षण आहे. त्यांच्यावरही अनेकदा अन्याय होतो; परंतु पाश्चात्य देश आणि तेथील माध्यमे “इसाई ब्लॉक’च्या नात्याने त्यांच्या पाठीशी उभी राहतात. पाकिस्तानी हिंदूंची अवस्था मात्र केविलवाणी आहे. कराचीतील एका हिंदू व्यापाऱ्याने सांगितले होते की, ज्याप्रमाणे एखाद्या नको असलेल्या अर्भकाला त्याची आई कचराकुंडीत गुपचूप सोडून येते, तसेच हिंदुस्थानने हिंदूंना सोडून दिले आहे. रीना आणि रवीना या मुलींच्या बाबतीत जे घडले, तो काही पाकिस्तानातील अशा प्रकारचा पहिलाच प्रसंग नव्हे.
मीरपूरमध्ये 1947 मध्ये झालेला नरसंहार थरकाप उडविणारा होता. त्यातून बचावलेल्यांना आजही जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळू शकलेले नाही. भारत हा इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीचे मालक असल्याप्रमाणे वागणाऱ्या नेत्यांचा देश बनला आहे. अशी एखादी घटना घडावी, ज्याची बातमी व्हावी, हजार-दहा हजार “रिट्विट’ मिळावेत, म्हणजे जन्म सार्थकी लागेल, असे या नेत्यांना वाटते. भारत देशांतर्गत हिंदूंचेही संरक्षण करू शकत नाही. आधुनिक राजांना जातिभेदांवर आधारित तिकीट वाटप केले जाते. काश्मिरी हिंदू मात्र अजूनही आपल्या घरापासून लांबच आहे. आत्ममग्न लोकांचा भारत आपल्या बचावासाठी येईल, अशी कल्पनाही पाकिस्तानी हिंदू करू शकत नाहीत.
रीना आणि रविनाबाबत घडलेल्या प्रसंगावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी “ट्विट’ केले, तर काहीतरी “ऐतिहासिक’ घडल्याचा आभास निर्माण करण्यात आला. ही आहे पाकिस्तानातील हिंदूंची परिस्थिती. सत्तर वर्षांनंतर भारताने पाकिस्तानातील हिंदूंची दखल घेतली. त्यांना नागरिकत्व देण्याचा कायदा बनवला. देशातील सर्व धर्मनिरपेक्ष अंध विरोधकांचा विरोध असतानासुद्धा नागरिकता कायदा करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. या बाबी भारतातील हिंदूंना आकर्षित करणाऱ्या आहेत; पण पाकिस्तानात किंवा बांगलादेशात मुस्लिमांचा अत्याचार सहन करणाऱ्या हिंदूंना त्याचा काय उपयोग?