नदीच्या दुतर्फा उत्तर भारतीयांची मांदियाळी
आळंदी – सूर्यदेव आणि छट माता यांची पूजा म्हणजे छटपूजेची प्राचीन परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जाते. आळंदी व परिसरात राहणारे उत्तर भारतीयही मोठ्या उत्साहाने ही छट पूजा साजरी करतात. यंदाही हजारोंच्या साक्षीने आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठावर हा विलक्षण सोहळा रंगल्याने अलंकापुरीला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
प्रतिवर्षी छटपूजा निमित्त येथील गर्दीत उत्तरोत्तर वाढ होताना दिसत आहे.
आज इंद्रायणी नदीच्या तीरी उत्तरभारतीयांनी ठिकठिकाणी पूजा बांधली होती. यानिमित्त इंद्रायणीच्या विश्वशांती या केंद्राच्या विश्वरूप दर्शन मंचावर छटमहापर्व म्हणून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर भारतीयांचे कार्यकर्ते उपस्थितांना मार्गदर्शन करून छटपूजा विषयीची माहिती सांगत होते. याप्रसंगी आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजंता उमरगेकर, नगरसेवक, नगरसेविका, भाऊसाहेब कोळेकर आदींसह आळंदीकर नागरिक व भाविक उपस्थित होते.