कलंदर: राज गप्पा…

उत्तम पिंगळे

गडावरील विजयाचा आनंद तसेच दिल्लीतील शपथविधी उरकून राजे व राजपुत्र आपल्या भवनात रात्री भोजनोत्तर थोडी शतपावली करीत आहेत.

राजे: काय युवराज, दिल्लीत खूपच गरम होतं ना?
युवराज: होय महाराज, पण गरम म्हणजे आपण कोणत्या दृष्टीने बोलत आहात, ते मी समजलो नाही.
राजे: उगाचच त्या शत्रू गोटातील युवराजासारखे काही बरळू नका. आपण वयाने लहान आहात, पण आपली समज दांडगी आहे हे आम्ही जाणतो.
युवराज: कसला तरी आपण विचार करत आहात, कारण मघापासून माझे बारीक लक्ष आहे की, तुम्ही कोणत्या तरी विचारात आहात असे वाटते.
राजे: युवराज, आता एवढे तुम्हाला समजले आहे तर काय विचार करत होतो तेही समजले असेलच, ते ही तुम्हीच सांगा.
युवराज: मला वाटते की, दिल्लीश्‍वरांच्या शपथविधीला आपण गेलो; पण आपल्याला एकच मंत्रिपद बहाल केले गेले. ते बरोबर केले की नाही हाच विचार आपल्या मनात घोळत असावा, असे आम्हास वाटते.
राजे: अगदी बरोबर, आपण योग्य तोच अंदाज केलेला आहे.
युवराज: मग बरोबर ओळखले ना? कारण मीही तोच विचार करत होतो. बिहार संस्थानातील राजांनी त्यांचे सोळा सरदार निवडून आले असून एक मंत्रिपद दिलेले त्यांनी नाकारले. आपले तर अठरा सरदार निवडून आलेले आहेत.
राजे: तोच विचार करत होतो की, आपण जे केले ते बरोबर केले की नाही?
युवराज: आता आपण जाणते आहात, मी काय सांगावे? पण मी एक अभ्यास केला आहे की, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र गर्जना करणारे दिल्लीत पोहोचताच चिडीचूप होतात आणि हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेले कोडे आहे.
राजे: खरं बोलत आहात आपण, त्या बिहारी राजाने बाणेदारपणा दाखवला आणि हो, पण ते आपले विसरले का आठवले त्यांचा एकही सरदार नसताना त्यांना मंत्रिपद मिळाले. आपले तर 18 सरदार असूनही आपल्याला अडगळीतील त्या “अवजड’ खात्यावर बोळवण केली.
युवराज: मग आता आपण काय करावयाचे?
राजे: हं… तोच विचार करतोय, पण काय सध्या आपले हात 303 खाली अडकले आहेत.
युवराज: म्हणजे 303 कलम आपल्यावर आहे? कारण या कलमांवरील गुन्ह्याला आर्थिक शिक्षा नसते तर थेट डेथ पेनाल्टी असते, असं वाचलं आहे.
राजे: युवराज, आम्ही 303 कलमांबाबत बोलत नाही आहोत. त्यांचे देशभरातून 303 सरदार निवडून आले आहेत. त्यांनी तरी कुणाकुणाला मंत्रिपद द्यावे. त्यांनाही मर्यादा आहेत व आम्हाला त्याची जाणीव आहे.
युवराज: होय, पण आता गोष्ट होऊन गेलेली आहे. त्यामुळे काय कराचे ते पुढेच ठरवू.
राजे: काय करायचे म्हणजे सध्यातरी काही नाही. कारण नुकतेच एक सरदार मंत्रिपदी प्रथमच विराजमान झाले व त्यांचा आनंद काढून घेणे मला प्रशस्त वाटत नाही.
युवराज: एक सूचना आहे सांगू, (राजे मान डोलावतात) आता आपल्या संस्थानात निवडणुका येऊ घातल्या आहेत. आपण युती तर करणार आहोत; पण जागावाटपात आपण जास्त जागांची मागणी धरून ठेवायची. अर्थात ते देणार नाहीत कारण आताच्या निवडणुकीतून त्यांना विधानसभेचा कल समजला आहेच. आपण उगाउगा अडवणूक करून ठेवायची आणि “वरती’ एक मंत्रिपद गळ्यात पाडून घ्यायचे आणि मग खाली “तडजोड’ करावयाची. (दोघेही हसतात)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.