आता होणार सर्वोच्च ४०,००० पातळीचा पाठलाग! (भाग-१)

Market can surprise you in a thousand different ways!असं कोणीतरी म्हटलंय, परंतु ते किती रास्त आहे आहे याचा अनुभव गेल्या आठवड्यात आला. मी निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलत नसून आपल्या बाजाराबद्दलच बोलतोय. मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी वर्तवले गेलेले जनमत चाचण्यांचे अंदाज हे बहुतेक आताच्याच सरकारच्या पक्षात आपलं झुकतं माप टाकणारे होते आणि त्याचे परिणाम लगेचच दुसऱ्या दिवशी बाजारात उमटले. सेन्सेक्सनं १४०० अंशांची उडी मारली तर निफ्टी ४०० अंशांनी उसळली, जी शक्यता प्रत्यक्षात २३ तारखेस म्हणजे निवडणूक निकालाच्या दिवशी अपेक्षित होती. निकालाच्या दिवशी प्रत्यक्षात जनमत कौल चाचण्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक जागांची कमाई होऊनसुद्धा बाजारानं अशा निकालांकडं पाठच फिरवली आणि सेन्सेक्स बंद होताना मात्र दिवसाच्या उच्चांकापासून १३०० अंशांची आपटी खाऊन बंद झाला तर विस्तारित पाया असलेली निफ्टी देखील उच्चांकापासून ३८४ अंशांनी घसरली. म्हणजे अंदाजांवर बाजारानं जोरदार तेजीची प्रतिक्रिया नोंदवली परंतु निकालाच्या दिवशी मात्र प्रत्यक्षात जागा वाढून देखील बाजारानं पाठ न थोपटता पाठीत बडगाच घातला. याला बाजारात एक म्हण आहे, Buy on expectations or rumors and sell on news ! एकूणच याची कुणकुण निकालांच्या आदल्या दिवशी लागलीच होती कारण २३ मे च्या एक्स्पायरीचे कॉल व पुट ऑप्शन्सचे प्रीमियम्स हे नेहमीच्या तुलनेत खूप जास्त म्हणजे वधारलेले होते.

फक्त एका दिवसासाठी इतका भाव हा न पटण्याजोगा होता. म्हणजेच अनेकदा पाहिलेलं टोमॅटोच्या बाजारातील नाट्य म्हणजे कमी किंमतीत माल विकायचा नाही परंतु तोच माल मात्र रस्त्यावर फेकायची तयारी ठेवायची.   त्यामुळं, बाजाराच्या अशा लहरीनंमागील लेखात म्हटल्याप्रमाणं सर्वांत जास्त पोझिशन्स असलेला १२००० स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन हा दुसऱ्याच दिवशी तिप्पट तर प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी साडेचार पट अथवा दोनशे रुपयापर्यंत वाढला. त्याउलट ११००० चा पुट ऑप्शनचा भाव शंभर रुपयांनी उतरला.त्यामुळं त्या खेळीचा फायदा म्हणावा तसा उठवता आला नाही.

मागील गुरुवारी म्हणजे निवडणूक निकालाच्या दिवशी बाजारानं दोन महत्त्वाचे टप्पे पार केले. सेन्सेक्स व निफ्टी, आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन आले. सेन्सेक्सनं ४०००० चं शिखर गाठलं तर निफ्टीनं १२००० ला गवसणी घातली. अर्थातच वर म्हटल्याप्रमाणं बाजार त्या शिखरांवर स्थिर राहू शकला नाही ही देखील वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.

आता होणार सर्वोच्च ४०,००० पातळीचा पाठलाग! (भाग-२)

ऐतिहासिक आकडेवारीनुसार २००४ पासून शेअर बाजाराने बाजारातील सहभागींना निवडणूक निकालांच्या दिवशी कधीही निराश केलेलं नाही. मागील निवडणूक निकालांच्या दिवशी म्हणजेच १६ मे २०१४ साली सेन्सेक्सनं प्रथमच २५००० चा टप्पा ओलांडला होता तर निफ्टीनं ७५०० चा. २००९ साली, बाजारानं न भूतो न भविष्यति तेजी अनुभवली होती. संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार दुसऱ्या खेपेस निवडून आलं तेव्हा शनिवार असल्यानं १८ मे रोजी सेन्सेक्सनं २१११ अंशांची तेजी अनुभवली होती. त्या दिवशी बाजारातील व्यवहार बंद करण्यात आले होते (सर्किट फिल्टर) तर २००४ साली देखील बाजारानं सुमारे १% तेजीच अनुभवली होती. ह्याच खेपेस मात्र अनेकांची अपेक्षा सरकारनं पूर्ण केली असली तरी बाजारानं मात्र अपेक्षाभंग केलाव निफ्टी एकाच दिवसात ३८४ अंशांनी पडली व गेल्या ११ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती की एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात निफ्टी पडण्याची.आकडेवारी सांगते की, सरकार स्थापनेतील अनिश्चिततेच्या कारणांमुळं निवडणूक वर्ष १९९६ व १९९८ वगळता, (ज्यावर्षी सेन्सेक्स अनुक्रमे १७ टक्के व सुमारे पाऊण टक्का घसरला होता) बीएसई सेन्सेक्सनं निवडणूक वर्षी सकारात्मक परतावेच दिलेले आहेत. १९९९ साली ६४ टक्के, २००४ साली १३%, २००९ मध्ये ८१ टक्के, २०१४ साली ३० टक्के. या वर्षी आतापर्यंत सेन्सेक्सनं साडे सात टक्के परतावा दिलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.