आता होणार सर्वोच्च ४०,००० पातळीचा पाठलाग! (भाग-१)
एकूणच अमेरिका व चीन यांमधील व्यापारयुद्ध, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, पुढील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचं पतधोरण, मोसमी पावसाचं आगमन व त्याचा मूड, जुलै महिन्यात मांडला जाणारा पूर्ण अर्थसंकल्प, जुन्या अर्थसंकल्पामध्ये देऊ केलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी होणारी कसरत, एनबीएफसी कंपन्यांबाबत निर्माण झालेली आशंका, भारतीय जीडीपीच्या आकडेवारीबद्दलची विश्वासार्हता, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील काही मोठे समूह, इराण निर्बंधांचा होणारा अर्थव्यवस्थेवरील परिणाम, बेरोजगारीचं संकट, इ. गोष्टी, आणि यांव्यतिरिक्त जनतेच्या इतर अपेक्षा या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे हाताळताना खरंच,पंतप्रधान नरेंद्र मोदीव त्यांच्या चमूचा यापुढील वर्षांत कस लागणार हे नक्की आणि त्यामुळं अशा परिस्थितीत कसास लागलेल्याच / लागू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास जाणकार सुचवत आहेत.अर्थातच आगामी वर्षांत जसजशी सरकारची धोरणं बदलत जातील, त्याप्रमाणं आपल्या पोर्टफोलिओमध्ये देखील काही बदल अपरिहार्य ठरतातच यांवर पुन्हा कधीतरी.
या परिस्थितीतलार्ज कॅप समूहातील कांही उत्तम कंपन्या –
बजाज फायनान्स : बाजारात असलेला सुलभ कर्जाचा सुळसुळाट व त्याला तितकीच असलेली मागणी ह्या कंपनीच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.
एचडीएफसी बँक : उत्तम व्यवस्थापन, भारतभर व्यापक जाळं असलेली व परकीय गुंतवणूकदारांच्या गळ्यातील ताईत असलेली अशी ही बँक असून आपल्या पोर्टफोलिओला देखील चार चाँद लावू शकते.
आयसीआयसीआय बँक : मालमत्तेतील सुधारणा व वाढ या गोष्टी बँकेसाठी जमेच्या ठरू शकतात.
कोटक बँक : गेल्या कांही महिन्यांत या बँकेनं घेतलेला सकारात्मक पवित्रा अनेक ब्रोकरेज हाऊसना खुणावत आहे.
लार्सन अँड टूब्रो : सगळ्यांत मोठी इंजिनीअरिंग व कन्स्ट्रक्शन कंपनी असून देशांतर्गत भांडवली खर्चाच्या दृष्टीनं थेट लाभार्थी आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज : रिलायन्स जिओ, रिटेल क्षेत्रामधील या समूहाची आक्रमकता व मागील लेखात नमूद केलेल्या गोष्टी यांमुळं हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमधील प्रमुख शेअर ठरू शकतो.
स्टेट बँक : भारतातील सर्वांत मोठी बँक. इतर सरकारी बँकांच्या तुलनेत किंचित महाग वाटणारी परंतु सुधारलेला ताळेबंद व पुस्तकी मूल्याच्या केवळ दीडपट भाव असणारी बँक म्हणून या बँकेकडं पाहता येऊ शकतं.
टीसीएस : अमेरिकी डॉलर मधील तेजी या शेअरच्या भागधारकांना नक्कीच सुखावेल.
एकूणच पाहिलं तर मागील कांही दिवसांत आलेली बाजारातील तेजी ही सर्वांगीण तेजी नव्हती तर निर्देशांकातील प्रमुख अशा मूठभर कंपन्यांचे भाव वधारून आलेली तेजी होती. त्यामुळं आता सरकारनं प्रगतीस पूरक अशी ठोस पावलं उचलल्यास सर्वच उद्योगांस चालना मिळून सर्वांगीण म्हणजे मिड कॅप, स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये देखील तेजी पाहता येऊ शकेल. आगामी वर्षांत सरकारनं कोणती पावलं उचलली पाहिजेत या गोष्टींना मुरड घालत सरकार जे निर्णय घेईल त्यावर बाजार आपली प्रतिक्रिया वेळोवेळी देईलच, अशाचवेळी संधी साधून आपली पोळी भाजणं हेच काय ते आगामी दिवसांत आपल्या हातात राहील.