पुणे – महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय संस्था आणि ट्रस्टना 31 मार्च 2020 अखेरच्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण (ऑडिट) केलेले ताळेबंद (बॅलेन्स शीट) धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून पोचपावतीसह ताळेबंदाच्या प्रती स्थानिक धर्मादाय आयुक्तालयात दाखल करण्यास केवळ आठ दिवस राहिले आहेत.
नियमानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिलपासून सहा महिन्यांत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद धर्मादाय संस्थांनी सादर करायचे असतात. तथापी करोनामुळे अनेक संस्थांना आपली हिशोबपत्रके वेळेत तयार करता आली नाहीत.
अनलॉकनंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नव्हते. त्यामुळे 30 नोव्हेंबर, 31 डिसेंबर व आता “अंतिमत:’ 31 जानेवारीपर्यंत हे हिशोब सादर करण्यास महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त रा. ना. जोशी यांनी ही मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे परिपत्रक क्र. 584 नुसार धर्मादाय संस्थांना आपली हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची ही शेवटची संधी आहे.
धर्मादाय संस्थांना गेल्या वर्षातील आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षणाचे ताळेबंद ऑनलाइन पद्धतीने धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यावर त्याची पोहोच मिळते. त्यानंतर सदर पोहोच व त्यासोबत अनुसूची “9ड’ नुसार सर्व विश्वस्तांचे पॅन क्रमांक देणे आता अनिवार्य आहे. तसेच, ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्यांबाबतचे सर्व स्रोत व त्याचा विनियोग न्यासाच्या उद्दिष्ठपूर्तीसाठीच होत आहे, असे नमूद केलेले सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
प्राप्तिकर विभागानेही वार्षिक अहवाल दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यास अनुसरून ज्या ट्रस्टना आपले वार्षिक हिशोबपत्रकांचे सनदी लेखापालकांकडून लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. परंतु, करोना व लॉकडाऊनमुळे ज्या विश्वस्त संस्थांना लेखापरीक्षण सादर करणे अशक्य झाले होते. अशांनी धर्मादाय आयुक्तालयाने दिलेल्या या अंतिम मुदतवाढीत आपले लेखापरीक्षित ताळेबंद सादर करून पुढील दंडात्मक कारवाई टाळावी.
– ऍड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे