गुणवंतांच्या जीवनात आशेचा किरण दिसावा! : शिवकुमार डिगे

बालगंधर्व रंगमंदिर : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे, (डावीकडून) नंदकुमार रोजेकर, भाऊसाहेब जाधव, अनिल कवडे, प्रतापराव पवार, माणिकराव गोते, साधना झाडबुके आदी

गरजूंना “दिशा’ देण्यासाठी आता धर्मादाय आयुक्तालयाचाही पुढाकार
गरजू व गुणवंतांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात

प्रभात वृत्तसेवा
पुणे,  “गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी “दिशा परिवार’च्या माध्यमातून दाते पुढे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे. आता यात धर्मादाय आयुक्तालयाची भर पडली आहे. यापुढे आर्थिक स्थिती नसलेल्या गरीब, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धर्मादाय आयुक्‍त सर्वांत पुढे राहतील आणि या विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी कार्यक्रमात दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दात्यांच्या माध्यमातून मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डिगे बोलत होते. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, उद्योजक प्रतापराव पवार, दिशा परिवारचे मार्गदर्शक व मराठवाडा मित्र मंडळाचे सचिव भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके, ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव गोते, संस्थेच्या शिष्यवृत्ती प्रदान समितीचे अध्यक्ष नंदकुमार रोजेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत देण्याचा सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला.

चळवळ पुढे नेण्याचा विद्यार्थ्यांनीच केला संकल्प
दिशा परिवारच्या माध्यमातून शैक्षणिक पालकत्व घेणाऱ्या दात्यांच्या मदतीतून शिक्षण पूर्ण झाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. यामुळे आम्ही आता आयुष्यात उभे राहात आहोत. मात्र, ही चळवळ येथेच न संपता आपल्या रकमेतून काही मदत दाते म्हणून देण्याचा निर्धार स्वावलंबी झालेल्या विद्यार्थ्यांनी केला. एवढेच नव्हे, तर काही जणांनी थेट मदत देऊन ही चळवळ पुढे नेण्याचा संकल्प केला.

“प्रभात’च्या आठवणींना उजाळा
आताच्या विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थिती काय असते, हे समजण्यासाठी प्रताप पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील संघर्षमय आठवणींना उजाळा दिला. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी उत्तीर्ण झाल्याची बातमी कोणत्याच वृत्तपत्रात प्रकाशित झाली नव्हती. मात्र ती बातमी दै. “प्रभात’मध्ये छापून आल्याचा आवर्जून उल्लेख पवार यांनी यावेळी केला.

डिगे म्हणाले, “गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीने अनेकांना शिक्षण घेता येत नाही. त्यांना कोणताच मार्ग सापडत नाही. त्यांच्या जीवनात आशेचा किरण दिसावा, यासाठी दिशा परिवार कार्य करीत आहे, हे प्रशसंनीय आहे. समाजाला दिशा देण्याचे आणि नवी पिढी घडविण्याचे कार्य ही गोष्ट मोठी आहे. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता करपून जाऊ नये, यासाठी धर्मादाय आयुक्‍तांकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्‍तांच्या पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी गणपती मंडळामार्फत मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यातून गेल्या वर्षी साडेसात कोटी रुपयांचा निधी जमला झाला होता. त्याच धर्तीवर आता दिशा परिवार आणि धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाकडून आणखी उपक्रम राबविण्यात येणार आहे,’ असे ते म्हणाले. “गुणवत्तेचा वापर देशासाठी व समाजासाठी झाला पाहिजे. देशासाठी काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. तरच देश आणि समाज एकसंध राहील. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीवर मात करीत त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असेही डिगे यांनी सांगितले. डिगे यांनी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती देत, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

अनिल कवडे म्हणाले, “शैक्षणिक वाटचालीला मदत करण्याचे काम दिशा परिवारकडून होत आहे. भारतीय संस्कृती उच्च मूल्य जोपासणारी आहे. त्यानुसारच आपल्याकडे जे काही आहे, ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न होत आहे, हे आनंददायक आहे. खऱ्या अर्थाने मानवतेचा व मानवी विकासाचा वसा पुढे नेत आहात. ही चळवळ पुढच्या काळात आणखी वृद्धिगत होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.’

प्रतापराव पवार म्हणाले, “अडचणी आहेत म्हणून रडत बसू नका. मला जमणार नाही अथवा दुसऱ्यांना दोष न देता दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर सतत प्रयत्न करत राहिल्यास खडतर प्रवासातूनही आयुष्य उभे करता येऊ शकते.’

भाऊसाहेब जाधव म्हणाले, “आजच्या काळात विश्‍वासार्हता महत्त्वाची आहे. ही विश्‍वासार्हता दिशा परिवारने जपली आहे. गुणवंतांना ते मदत करतातच, पण त्यांच्या सुख-दु:खातही सहभागी होतात आणि व्यक्‍तिमत्त्व विकासाबरोबरच संस्कारही देतात, हेच दिशा परिवारचे वैशिष्ट्य आहे.’

गेली तीन वर्षं दिशा परिवारच्या मदतीने बी.कॉम. आणि एम.कॉम.चे शिक्षण होऊ शकले. आता बॅंकेत नोकरीही मिळाली. दिशा परिवारद्वारे केवळ मदत मिळते असे नाही, तर व्यक्‍तिमत्त्वाची जडणघडणही होते, हे महत्त्वाचे आहे. कसे बोलावे, कसे वागावे, नाती कशी वृद्धिगंत करावीत, असे संस्कार दिशा परिवारकडून मिळाले आहेत.
– अमोल झगडे, शिरूर.

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असताना दिशा परिवार मदतीसाठी पुढे आला. त्यांच्या माध्यमातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण झाले. केवळ मदत नव्हे, तर आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभाही मिळाली. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता शिक्षण पूर्ण केले. आता हैद्राबाद येथे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, माझ्या वेतनातील काही रक्‍कम गरजू विद्यार्थ्यांना देत आहे.
– सुजीत शिंदे, नेवासा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)