पुणे – पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांची वाशिम येथे पदोन्नतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वाशीम येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर हे येत्या 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
देशमुख यांनी मागील दोन वर्षांच्या कालावधीत गरीब, गरजू लोकांच्या मदतीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांनी धर्मादाय संस्था, देवस्थाने यांच्या माध्यमातून गरीब, गरजू युवक-युवतींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले.
आठ कोटी लिटर पाणीसाठा क्षमतेचा बंधारा उभारला. कडेपठार देवस्थानच्या ठिकाणी रोप-वे बांधण्यात येत आहे. एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये शैक्षणिक मदत केली. बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या कालावधीत टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक सहाय्य, गोशाळा, चारा छावण्या सुरू केल्या.
करोनाच्या कालावधीत धर्मादाय देवस्थानांना रुग्णांच्या उपचारासाठी दानपेट्या खुल्या करण्याचे आवाहन केले होते. त्याला देवस्थान आणि संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून ससून रुग्णालयाला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
दोन लाख होमिओपॅथी अर्सेनिक गोळ्या उपलब्ध करून दिल्या. तसेच, 50 हजार नागरिकांना दररोज दोन महिने जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. याशिवाय बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील महिलांना धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून दररोज मोफत जेवण आणि साड्यांचे वाटप करण्यात आले.