पुसेगाव (प्रकाश राजेघाटगे) – महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प. पू. श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव यात्रेतील धार्मिक विधी रूढी व परंपरेनुसार करून, साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
पारंपरिक धार्मिक विधी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुजारी व विश्वस्तांनी पार पाडले. त्यानंतर श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका रथात ठेवण्यात आल्या. जमावबंदी असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सपोनि विश्वजित घोडके, तलाठी गणेश बोबडे उपस्थित होते. दर्शनासाठी मंदिरात कोणालाही सोडण्यात आले नाही. अत्यावश्यक सेवा वगळता पुसेगावमधील बाजारपेठ दिवसभर बंद होती.
दरम्यान, रथ व समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. पुसेगाव शहर व मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले होते. परगावातील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला गेला नाही. गावातील नागरिकांनाही रस्त्यावर फिरकू दिले नाही.
मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी आपापल्या घरी श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती व मनोभावे स्मरण करून फेसबुक लाइव्ह व यूट्यूबच्या माध्यमातून सुवर्णमंडित समाधी व रथाच्या लाइव्ह दर्शनाचा आनंद लुटला.
यात्रा सुरू झाल्यापासून आजअखेर सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेल्या, फुलांनी सजविलेल्या रथाच्या मिरवणुकीची परंपरा आहे; परंतु करोनाच्या साथीमुळे तब्बल 72 वर्षांनी रथ मिरवणुकीसह यात्रेत यंदा खंड पडला.