पुणे – महापालिकेकडून पीएमपीला दिलेल्या जागांवर आता इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने नुकतीच मान्यता दिली आहे. दरम्यान, ही स्टेशन फक्त पीएमपीच्या बसेस साठीच असतील तसेच या जागांचा वापर पीएमपीच करेल, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली. त्यानंतर या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या विकास आराखड्यात पीएमपीसाठी काही जागा प्रस्तावित आहेत. या जागा पीएमपीला शहराच्या वेगवेगळ्या भागात डेपो उभारणी तसेच बसच्या पार्किंगसाठी प्रस्तावित आहेत. या जागा पीएमपीला मिळाल्यास पीएमपीचे “डेड’ किलोमीटर कमी होणार असल्याने या जागा नाममात्र दराने पीएमपीला देण्यात आल्या आहेत.
तर पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस आल्या असल्याने पीएमपीला जागा कमी पडत आहेत. त्यामुळे आणखी काही जागांची मागणी पीएमपीने केली होती तसेच त्या सोबत या ठिकाणी पीएमपीच्या ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार, हे प्रस्ताव स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर मुख्यसभेत हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते.
या वेळी पीएमपीला जागा देण्यास हरकत नाही. मात्र, हे स्टेशन पीएमपीच्या वापरासाठीच उभारावेत तसेच पीएमपीनेच हे वापरले जावेत, अशा सूचना करण्यात आल्या त्यानंतर या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
पीएमपीची खास सभा घेणार : महापौर
पीएमपीला जागा देणे, चार्जिंग स्टेशन उभारणे तसेच पीएमपीला संचलन तूट देण्याचा विषय बुधवारी झालेल्या मुख्यसभेत मान्यतेसाठी होते. त्यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतले तसेच या प्रकरणी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी खुलासा करण्याची मागणी केले. मात्र, पीएमपी प्रमुखांना करोनाची लागण झाल्याने ते बैठकीस उपस्थित नसल्याने तसेच पीएमपीचे अधिकारी नसल्याने या प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी, अशी विनंती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी सर्व सभासदांना केली. तर पीएमपीच्या विषयावर स्वतंत्र खास सभा घेण्याचे आश्वासन या वेळी महापौरांनी सर्व नगरसेवकांना दिले.