नवी दिल्ली – परदेशांत असणाऱ्या 16 आरोपींविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी हालचाली करत असल्याच्या आरोपावरून ती कारवाई करण्यात आली.
एनआयएने येथील न्यायालयात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये आरोपी करण्यात आलेले 7 जण अमेरिकेत राहतात. त्याशिवाय, ब्रिटनस्थित 6 जणांना आणि कॅनडास्थित तिघांना आरोपी करण्यात आले आहे.
ते आरोपी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या संघटनेचे सदस्य आहेत. त्या संघटनेला याआधीच यूएपीए अंतर्गत बेकायदा ठरवण्यात आले आहे. ती संघटना पाकिस्तान आणि इतर देशांच्या भूमीतून सक्रिय असणाऱ्या खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांची शाखा असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे.
मानवी हक्कांचा पुरस्कार करण्याच्या नावाखाली एसएफजेची स्थापना करण्यात आली. त्या संघटनेकडून रेफरंडम 2020 या नावाने सोशल मीडियावरून एक मोहीम चालवली जात आहे. ती मोहीम देशद्रोही कारवायांना आणि वैरभावाला खतपाणी घालत असल्याचा ठपका एनआयएने ठेवला आहे. काही आरोपींना याआधीच भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.